रेमडेसिव्‍हिरचा मागणीच्‍या तुलनेत पुरवठा कमीच; बदलत्‍या नियमांमुळे रुग्‍णांचे नातेवाईक त्रस्‍त 

नाशिक ः काही दिवसांपासून तुटवड्यामुळे कोरोनाबाधितांच्‍या नातेवाइकांना रेमडेसिव्‍हिर इंजेक्‍शन मिळविण्यासाठी दमछाक करावी लागत आहे. डॉक्‍टरांकडून मागणी केल्‍याने रुग्‍णांच्‍या नातेवाइकांकडून रविवारी (ता. ११) इंजेक्‍शनचा शोध दिवसभर सुरू राहीला.

 बदलत्‍या नियमांमुळे रुग्‍णांचे नातेवाईक त्रस्‍त

शहर परिसरातील औषध विक्रेत्‍यांची बैठक रविवारी (ता. ११) अन्न व औषध प्रशासन कार्यालयात झाली. तीत सुधारित आदेशाच्‍या अनुषंगाने विक्रेत्‍यांना सूचना देण्यात आल्‍या आहेत. असे असले तरी दुसरीकडे रुग्‍णांच्‍या नातेवाइकांची इंजेक्‍शनसाठी धावपळ सुरूच आहे. यापूर्वी डॉक्‍टरांच्‍या चिठ्ठवर (प्रिस्‍क्रीप्‍शन) व आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता केल्‍यावर इंजेक्‍शन मिळत होते. जिल्‍हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाहणी केल्‍यानंतर जारी केलेल्‍या आदेशांनंतर यापूर्वीच्‍या आवश्‍यक कागदपत्रांसह डॉक्‍टरांच्‍या सही व शिक्‍यासह शिफारसपत्र देणे आवश्‍यक आहे. जिल्‍हाधिकारी सूरज मांढरे यांनी काढलेल्‍या आदेशानंतर विक्रेत्‍यांच्‍या दुकानापुढील रांगा ओसरल्‍या.

हेही वाचा - ह्रदयद्रावक; वडिलांसह दोन्ही लेकांची अंत्ययात्रा, एकाच वेळी ३ कर्त्या पुरुषांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा

नियम बदलले तरीही तुटवडा कायम 

बदलत्‍या नियमांमुळे नातेवाइकांची अतिरिक्‍त दमछाक झाली. यात पुन्‍हा एकदा बदल करण्यात आला असून, आता रुग्‍णालयांनी मागणीपत्र द्यायचे आहे. प्रक्रियेत होणाऱ्या सातत्‍याच्‍या बदलांमुळे संभ्रम निर्माण होत आहे. मागणीच्‍या तुलनेत पुरवठा कमी असला, तरी सातत्‍याने नियमांमध्ये होणाऱ्या बदलांमुळेही रुग्‍णाचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत.तरी जिल्‍ह्यात रेमडेसिव्‍हिरचा तुटवडा कायम असल्‍याचे ‘सकाळ’च्‍या पडताळणीत आढळून आले.

रुग्‍णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत नाहीच 

एकीकडे रेमडेसिव्‍हिर इंजेक्‍शनचा तुटवडा कायम असून, दुसरीकडे ऑक्सिजनच्‍या उपलब्‍धतेचा प्रश्‍नही मिटलेला नाही. ऑक्सिजनचा नियमित पुरवठा होत नसल्‍याने नवीन रुग्‍ण दाखल करून घेता येणे शक्‍य नसल्‍याचे काही डॉक्‍टरांनी सांगितले. अशात आता उद्योगांसाठी राखीव २० टक्‍के ऑक्सिजनचाही वापर वैद्यकीय क्षेत्रासाठी व्‍हावा, अशी मागणी होत आहे. 

रुग्‍णालयांना थेट इंजेक्‍शन खरेदीसाठी शर्तींच्‍या आधारे परवानगी : सह-आयुक्‍त दुष्यंत भामरे

रविवारी (ता. ११) दुपारी उशीरा रेमडेसिव्‍हिरचे एकूण तीन हजार ४३४ व्‍हायल उपलब्‍ध झाले. अटी व शर्तींच्‍या अधीन राहून व कायद्यातील तरतुदींनुसार रुग्‍णालयांनी त्‍यांच्‍या स्‍तरावर इंजेक्‍शनची खरेदी करण्याची मुभा देत असल्‍याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह-आयुक्‍त दुष्यंत भामरे यांनी दिली. ते म्‍हणाले, की रुग्‍णालयात दाखल रुग्‍णांसाठीच या इंजेक्‍शनचा वापर करायचा असून, एमआरपीपेक्षा जादा पैसे न आकारण्याच्‍याही सूचना दिल्‍या आहेत. नव्‍याने अवलंबलेल्‍या कार्यपद्धतीमुळे इंजेक्‍शनचा काळाबाजार कमी होईल, असा विश्र्वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला. दरम्‍यान, भरारी पथकाच्या माध्यमातून वितरण प्रक्रियेवर लक्ष ठेवले जात असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ