नाशिक : पुढारी वृत्तसेवा – रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेसह ६२ जणांची सहा कोटी दोन लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पाच परप्रांतीयांसह सात संशयितांवर उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वीरेश राजेश वाबळे (रा. नर्मदा हौसिंग सोसायटी, लोखंडे मळा, जेल रोड, नाशिक रोड) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. वीरेश वाबळे हे जिम ट्रेनर म्हणून काम पाहतात. दि. १५ ते १८ डिसेंबर २०२१ या कालावधीत ते सायंकाळच्या वेळी घरी असताना त्यांचे परिचित शैलेंद्र महिरे यांचा फोन आला होता. त्यावेळी महिरे यांनी त्यांच्या फोनवरून संशयित आरोपी रमणसिंग उर्फ विशालसिंग (रा. कोलकाता) याच्याशी व्हॉट्सॲपवरून बोलणे करून दिले होते. रमणसिंगने महिरे यांच्या मुलाला रेल्वेत नोकरीला लावून दिले होते. त्यामुळे वाबळे यांचा रमणसिंगवर विश्वास बसला. रमणसिंगने वाबळे यांना त्यांच्या पत्नीस रेल्वेमध्ये नोकरीस लावून देतो, असे आमिष दाखविले. या कामासाठी रमणसिंगने वाबळे यांच्याकडून प्रथम आठ लाख रुपये घेतले. तसेच या प्रक्रियेदरम्यान संशयित आरोपी रमणसिंग, नीरज सिंग (रा. टाटानगर, झारखंड), ऋतुराज पाटील उर्फ हेमंत हनुमंत पाटील (रा. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा, जि. सांगली), राजेंद्र सिंग (रा. कोलकाता), अंशुमन प्रसाद (रा. रांची, झारखंड), संदीप सिंग (रा. रांची, झारखंड) व जैद अली (रा. वाशी, नवी मुंबई) यांनीही वाबळे यांच्या पत्नीस भारतीय रेल्वेत नोकरी लावून देतो, असे आमिष दाखविले.
सर्व संशयित आरोपींनी भारतीय रेल्वेचे बनावट व खोटे लेटरहेड, कागदपत्रे, शिक्के तयार करून वाबळे यांच्याकडून वेळोवेळी रेल्वेतील नोकरी कायम करण्याकरिता एकूण ११ लाख रुपये घेतले. हा प्रकार १५ डिसेंबर २०२१ ते १३ जून २०२४ यादरम्यान जेल रोड येथे फिर्यादी वाबळे यांच्या घरी घडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वाबळे यांनी उपनगर पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक कोल्हे अधिक तपास करीत आहेत.
अनेकांची फसवणूक
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने फिर्यादी वाबळे यांच्याकडून वेळोवेळी रक्कम उकळली जात असतानाच संशयितांकडून तब्बल ६२ नागरिकांनादेखील असेच आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी रक्कम उकळली जात होती. २०२१ ते २०२४ या दरम्यान संशयितांना ६२ नागरिकांकडून तब्बल सहा कोटी दोन लाख ३२ हजार रुपये उकळले होते. दरम्यान, ज्यांची फसवणूक झाली, त्यांनी तक्रारीसाठी पुढे यावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: