रेल्वेने थकविली ६८ लाखांची पाणीपट्टी; तर शासकीय कार्यालयांकडे सव्वाचार कोटी थकबाकी

नाशिक : सरकारी कार्यालयांची सर्वाधिक संख्या असलेल्या नाशिक शहरात ११५ शासकीय कार्यालयांनी महापालिकेची सव्वाचार कोटी रुपयांची पाणीपट्टी थकविल्याची बाब समोर आली असून, दहा लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शासकीय आस्थापनांना नोटिसा पाठविण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या आहेत.

नाशिक रोड विभागात अडीच कोटींपेक्षा अधिक रक्कम थकीत

केंद्र व राज्य शासनाच्या ८४ विभागांच्या कार्यालयाकडे ४.२६ कोटींची थकबाकी असून, पाणीपट्टीची सर्वाधिक थकबाकी सेंट्रल रेल्वेकडे ६८.४० लाख रुपये आहे. विभागप्रमुखांच्या बैठकीत पाणीपट्टी व घरपट्टी वसुली व थकबाकीचा आढावा घेण्यात आला. बैठकीत वसुलीच्या बाबतीत धक्कादायक माहिती समोर आली. थकबाकी व चालू उद्दिष्टापैकी या वर्षात फक्त सतरा कोटी रुपये वसुली झाली आहे. साडेचार महिन्यांमध्ये ८० कोटी रुपयांहून अधिक थकबाकी वसुलीचे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, सरकारी कार्यालयांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याची बाब समोर आली असून, सर्वाधिक सरकारी कार्यालये असलेल्या नाशिक रोड विभागात अडीच कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम थकीत आहे.

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

शासकीय कार्यालयांकडील थकबाकी

केंद्र व राज्य शासनाच्या ८४ विभागांच्या कार्यालयाकडे ४.२६ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची बाब समोर आली. पाणीपट्टीची सर्वाधिक थकबाकी सेंट्रल रेल्वेकडे ६८.४० लाख रुपये आहे, तर भारत प्रतिभूती मुद्रणालयाकडे ७१ लाख रुपये, करन्सी नोट प्रेसकडे २६ लाख ९३ हजार रुपये थकबाकी आहेत. पोलिस आयुक्त कार्यालयाकडे १.७६ लाख रुपये, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे १.७१ लाख, जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाकडे ३.३८ लाख रुपये, दारूबंदी अधीक्षक कार्यालयाकडे २.१२ लाख रुपये, भारत दूरसंचार निगम कार्यालयाकडे १०.१२ लाख रुपये, जिल्हा रुग्णालयाकडे २.४० लाख, सिडकोकडे ४.४३ लाख रुपये, महाराष्ट्र पोलिस अकादमीकडे १.३४ लाख रुपये थकबाकी आहे. ११५ शासकीय कार्यालयांकडे चार कोटी २६ लाख ७२ हजार ५०२ रुपयांची थकबाकी आहे.

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात