रेल्वेने पुन्हा एक थांबा काढल्याने नांदगावकर अस्वस्थ; ई-मेल पाठवल्याच्या २४ तासांतच निर्णय 

नांदगाव (नाशिक) : येथील स्थानकावरील थांबे काढून घेतल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याच्या प्रकाराकडे खासदार डॉ. भारती पवार यांनी थेट रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (ता. ३०) ई-मेल पाठविला खरा. मात्र त्यांचा हा ई-मेल पोचून काही तासही उलटत नाहीत तोच रेल्वेने वर्षानुवर्षे नांदगाव स्थानकावर थांबणाऱ्या ०३२०१/०३२०२ लोकमान्य टिळक टर्मिनस पटणा (जनता एक्स्प्रेस)चाही थांबा काढून घेतला आहे. 

लोकप्रतिनिधीच्या मागणीलाही केराची टोपली

नांदगावचा थांबा काढून घेतलेल्या गाड्यांची संख्या आता यामुळे अधिकृतरीत्या पाचवर पोचली आहे. कोरोना काळात प्रवासी गाड्यांचे थांबे काढून घेण्याच्या प्रकारामुळे शहरातील नागरिक संतप्त झाले आहेत. खुद्द लोकसभेतील लोकप्रतिनिधीने केलेल्या मागणीलाही रेल्वे प्रशासन जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, एकामागे एक थांबे बंद होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानकावर प्रवाशी वर्गासाठी असलेल्या बाकड्यांपैकी काही बाकडे स्थानिक प्रशासनाने काढून घेतल्याने नागरिकांच्या मनात मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

थांबे काढल्याने नाराजी

गाड्यांचे थांबे काढून घेण्यासोबतच स्थानकाचे महत्त्व कमी करण्याचा घाट तर घातला जात नाही ना, अशी शंका युवा फाउंडेशनचे सुमीत सोनावणे यांनी उपस्थित केली आहे. शहरात सबवेवरून अगोदरच रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीविरुद्ध वादंग उभे असल्याच्या पार्श्वभूमीवर आता स्थानकावरील वर्षानुवर्षे थांबणाऱ्या गाड्यांचे थांबे एकामागे एक काढून घेतले जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 
 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

खासदारांनी दिलेल्या पत्राला केराची टोपली दाखविण्याचे धाडस रेल्वे यंत्रणा दाखवीत असेल, तर ते खेदजनक असून जनेतला सोबत घेऊन रस्त्यावरची सर्वपक्षीय आंदोलने केल्याशिवाय पर्याय नाही. 
-संतोष गुप्ता, शिवसेना नेते