नाशिक : पुढारी वृत्तसेवा – राज्याच्या सुवर्णत्रिकोणातील नाशिक व पुणे या दोन शहरांना जोडणाऱ्या बहुचर्चित सेमी हायस्पीड रेल्वेमार्गामुळे महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळणार आहे. सन २००८ मध्ये सर्वप्रथम प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. पण, राजकीय अनास्थेमुळे आजपर्यंत हा प्रकल्प रखडला आहे. त्यामुळे प्रकल्पाची फाइल रेल्वे मंत्रालयात धूळ खात पडून आहे.
नाशिक-नगर-पुणे अशा तीन जिल्ह्यांसाठी वरदान ठरणाऱ्या २३२ किलोमीटर लांबीच्या सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग प्रस्तावित आहे. बहुचर्चित रेल्वेमार्गामुळे तिन्ही जिल्ह्यांमधील कृषी, पर्यटन तसेच औद्योगिक विकासाला बळ लाभणारच आहे. पण, उत्तर व दक्षिण भारताला जोडणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळेत व अंतरात बचत होणार आहे. भविष्यात त्याचा थेट लाभ प्रवाशांना होणार आहे. परंतु, राजकीय साठेमारीत हा महत्त्वाचा प्रकल्प अडकून पडला आहे. केवळ घोषणा, सर्वेक्षण तसेच प्रकल्पाच्या अलाइन्टमेंन्टमध्ये बदल या टप्प्याभोवती प्रकल्पाची फाइल फिरते आहे. त्यामुळे दोन्ही शहरांमधील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
आठ वेळेस बदल
बहुचर्चित नाशिक-पुणे रेल्वेमार्गाची २००८ मध्ये सर्वप्रथम घोषणा करण्यात आली. त्यानंतर २०१४ ला केंद्रांमध्ये सत्तांतर झाले. त्यानंतर प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला गती प्राप्त झाली. मात्र, मागील १० वर्षांत प्रकल्पाच्या नशिबी केवळ घोषणाच आल्या. दरम्यानच्या काळात एक नव्हे तर तब्बल आठ वेळेस रेल्वेमार्गाची अलाइन्टमेंट बदलण्यात आल्याने प्रकल्पाच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले.
नूतन खासदारांपुढे आव्हान
जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी राजाभाऊ वाजे व भास्कर भगरे यांना संसदेत पाठविले. या दोन्ही नूतन खासदारांपुढे संबंधित प्रकल्पाला केंद्राच्या मंजुरीसह निधी प्राप्त करून घेण्याचे आव्हान उभे ठाकणार आहे.
भू-संपादनासाठी २०२ कोटी
रेल्वेमार्गासाठी नाशिक व सिन्नर तालुक्यांत २२ गावांमध्ये भू-संपादन केले जाणार आहे. त्याकरिता २०२.२३५ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यानुसार २७ ऑक्टोबर २०२३ ला १२०.५४ कोटींच्या निधीची मागणी केली गेली. त्यामध्ये सिन्नरसाठी ११२.१२ कोटी, तर नाशिककरिता ८७. ४३५ काेटींची आवश्यकता आहे. तसेच वनजमिनींसाठी २.२४ कोटी व सरकारी जमिनींसाठी ०.४४ कोटींच्या निधीच गरज आहे.
रेल्वेमार्ग बदलण्याचा घाट
नाशिक-पुणे रेल्वेमार्गात एकूण 20 स्टेशन, 18 बोगदे तसेच 19 छोटे-मोठे उड्डाणपूल आहेत. परंतु या मार्गावरील बोगद्यांमुळे प्रकल्पाचा खर्चात भर पडणार आहे. त्यामुळे प्रस्तावित मार्गच बदलण्याचा घाट घातला जात आहे. शासनाकडून नव्या पर्यायानुसार नाशिक-शिर्डी-पुणे असा मार्ग नेण्याबद्दल चाचपणी केली जात आहे. मात्र, मार्गातील बदलामुळे प्रकल्पाचे अंतर 33 किलोमीटरने वाढणार आहे.
आजपर्यंत वाटप निधी
- खासगी क्षेत्र खरेदी : ५७.४९७ कोटी
- सिन्नर : ५७.४९७ कोटी
- नाशिक : खरेदी नाही
- शासकीय : ०.४२ कोटी
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- नाशिक-पुणेदरम्यान, दुहेरी २३२ किलाेमीटरचा मार्ग
- प्रकल्पासाठी एकुण अंदाजे १६००० कोटींचा खर्च
- नाशिकचे ५, सिन्नरमधील १७ गावांतून जाणार मार्ग
- सिन्नरमध्ये ४५.५१४ हेक्टर क्षेत्राची थेट खरेदी
- आजपर्यंत १३३ खरेदी दस्तांची नोंदणी
हेही वाचा: