रेल्वे कर्मचारी सध्या ‘हायरिस्क झोन’मध्ये! कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी सिव्हिलचा नकार 

नाशिक रोड : घोटी ते मनमाड स्थानकादरम्यान रेल्वेच्या ९० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या अनेक रेल्वेचे कर्मचारी उपचार घेत आहेत. रेल्वे विभागाने रेल्वे कर्मचाऱ्‍यांसाठी लसीकरणाची सुविधा सिव्हिल हॉस्पिटलकडे मागितली होती. मात्र सिव्हिल हॉस्पिटलने नकार दिल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. यामुळे रेल्वे कर्मचारी सध्या ‘हायरिस्क झोन’मध्ये काम करीत असून, त्यांच्यासाठी लसीकरणाची सुविधा रेल्वेस्थानकावर उपलब्ध करावी, अशी कर्मचारी व अधिकाऱ्यांची मागणी आहे. 

रेल्वे कर्मचारी सध्या ‘हायरिस्क झोन’मध्ये
भुसावळ विभागांतर्गत येणाऱ्या रेल्वेस्थानकांवर दिवसेंदिवस लोकसंपर्क येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. भुसावळ विभागाच्या डीआरएम कार्यालयाने सिव्हिल हॉस्पिटलला रेल्वे कर्मचाऱ्‍यांसाठी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, सिव्हिल हॉस्पिटलने ही सुविधा उपलब्ध करण्यास नकार दिला. त्यामुळे सध्या रेल्वेचे कर्मचारी खासगी व सरकारी दवाखान्यांत लसीकरणासाठी धावाधाव करीत आहे.

लसीकरणासाठी धावाधाव

नाशिक रोड रेल्वेस्थानकात जवळपास पाचशेहून अधिक कर्मचारी आहेत. रेल्वे आरपीएफ रेल्वे पोलिस तांत्रिक विभाग, कमर्शिअल विभाग, तिकीट विभाग, तिकीट चेकर याचबरोबर स्वच्छता कर्मचारीही आहेत. लसीकरणासाठी ते धावाधाव करीत आहेत. घोटी, इगतपुरी, मनमाड, नांदगाव स्थानकावरसुद्धा कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. रेल्वेच्या फ्रंटलाइन वर्करला लसीकरण करणे गरजेचे असतानाच रजा, सुट्या टाकून लसीकरणासाठी धावाधाव करावी लागत आहे. शासनाने प्रत्येक रेल्वेस्थानकावर कोरोना लसीकरण केंद्र उघडावे, अशी मागणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी केली आहे. 
 

रेल्वेचे फ्रंटलाइन वर्कर आणि अधिकारी दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. त्यांच्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलने लसीकरण सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी. येथील रेल्वेचा दवाखान्यात ती सुविधा उपलब्ध होऊ शकते. सिन्नर फाटा येथे महापालिकेच्या रुग्णालयात लसीकरणाला जायला सांगत आहे. याठिकाणी स्वतंत्र रेल्वे कर्मचाऱ्याची व्यवस्था नाही. 
- आर. के. कुठार, स्टेशन मास्तर