रेल्वे तिकीट आरक्षण केंद्र स्थलांतराला विरोध; जुन्याच जागेवर कार्यालय ठेवण्याची मागणी 

नाशिक : नाशिक रोड रेल्वे तिकीट आरक्षण केंद्र सिन्नर फाटा परिसरात स्थलांतरित झाले आहे. तेथे जाण्यासाठी देवी चौकातील पादचारी पूल, तसेच नाशिक-पुणे रस्त्यावरून सिन्नर फाटामार्गे जावे लागते. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. स्थानिक प्रशासनाने घेतलेल्या एकतर्फी निर्णयाने प्रवाशांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. 

रेल्वे तिकीट आरक्षण केंद्र स्थलांतराला विरोध 
रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील तिकीट आरक्षण केंद्र फलाट चार बाजूला म्हणजेच सिन्नर फाटा परिसराच्या बाजूला स्थलांतर केले आहे. तर जुन्या आरक्षण केंद्रांच्या जागेत जनरल तिकीट केंद्र सुरू केले आहे. प्रशासनाने केलेला बदल प्रशासकीय दृष्टीने सोईस्कर वाटत असला तरी प्रवाशांना मात्र प्रचंड त्रासदायक ठरताना दिसतो आहे. वयोवृद्ध, दिव्यांग आणि महिलांसाठी हे स्थलांतर मनस्ताप वाढविणारे ठरताना दिसते. मोठा लांब पल्ला गाठून आरक्षण केंद्र गाठावे लागत असल्याने प्रवासी त्रस्त होताना दिसतात. तसेच परिसरातून भरवस्तीतून जावे लागते. 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

नवीन केंद्रातील समस्या 
शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, शौचालय, स्वच्छतागृहाचा अभाव, अपूर्ण जागेमुळे आरक्षण केंद्रात सामाजिक अंतर नियमाचे पालन नाही, रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांचा बंदोबस्त नाही, रांगेत उभे राहण्यासाठी पुरेशी जागा नाही, चौथ्या फलाटावरील आरक्षण केंद्र बाजूचे गेट बंद असणे आदी समस्यांचा समावेश आहे. 

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट

...अशा आहेत उपाययोजना 
जुन्या जागेवर आरक्षण केंद्र पूर्ववत करावे किंवा मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूलाच आरक्षण केंद्र ठेवावे. नवीन जागेतील केंद्र तातडीने बंद करावे, नवीन जागेत केंद्र सुरूच ठेवले तर फलाट चारवरील गेट सुरू ठेवावे. जुने तिकीट घराजवळ पादचारी पुलावरून आरक्षण केंद्राकडे जाणारा पादचारी पूल व सरकते जिने सुरू करावे. 

 

रेल्वे आरक्षण केंद्र नवीन जागेत स्थलांतरित झाले आहे. याबाबत अनेक तक्रारी आलेल्या आहेत. याप्रश्नी आढावा घेऊन महाप्रबंधक यांच्याबरोबर चर्चा केली जाईल. -हेमंत गोडसे, खासदार 

 

 
स्थानिक रेल्वे प्रशासनाने सर्वप्रथम प्रवाशांच्या हिताला प्राधान्य द्यायला हवे. मनमानी पद्धतीने काम करू नये. प्रवासी आहेत म्हणून रेल्वेचे अस्तित्व आहे. लवकरच नवीन आरक्षण केंद्राला भेट देऊन समस्यांची पाहणी केली जाईल. वेळ पडली तर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची देखील भेट घेऊ. -राहुल ढिकले, आमदार