रेल्वे तिकीट दलालांविरुद्ध मोहीम तीव्र! ई-तिकिट काळाबाजार आणि आरक्षित आसने अडवून ठेवण्याच्या तक्रारी

नाशिक रोड : एकापेक्षा जास्त वैयक्तिक आयडी वापरून ई-तिकिटांचा काळा बाजार करण्याच्या आणि विशेष गाड्यांमध्ये आरक्षित आसने अडवून ठेवण्याच्या तक्रारी आल्यामुळे मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने तिकीट दलालांविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे.

रेल्वे तिकीट दलालांविरुद्ध मोहीम तीव्र

‘आरपीएफ’च्या पथकाने सायबर सेल आणि इतर इंटेलिजेन्स इनपुटमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे छापेमारीही सुरू केली आहे. मध्य रेल्वेच्या पाचही विभागांत हे छापे टाकण्यात आले. रेल्वे सुरक्षा दलाने वर्ष २०२० मध्ये रेल्वे कायद्याच्या तरतुदींनुसार ४६६ गुन्हे दाखल केले आहेत. या छापेमारी दरम्यान २.७८ कोटींची १४ हजार ३४३ तिकिटे जप्त केली. ४९२ जणांना अटक करण्यात आली. ४६६ प्रकरणांपैकी २५३ गुन्हे मुंबई विभागात दाखल असून १.४३ कोटींची सात हजार दोन तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. एकूण २६२ जणांना अटक करण्यात आली.  

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

२६२ जणांना अटक

भुसावळ विभागांसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आरपीएफचे अधिकारी-कर्मचारी या मोहिमेत हिरीरिने सहभागी होत असून, नागरिकांना काही माहिती असल्यास त्यांनी रेल्वे विभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. येथे ‘आरपीएफ’चे पोलिस निरीक्षक एन. व्ही. गुहलोत आणि सहाय्यक निरीक्षक डी. पी. झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम सुरू आहे.

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय!