रेशनकार्डधारकांची दिवाळी होणार गोड; शंभर रुपयांमध्ये चणाडाळ, तेल, रवा, साखर

रवा, चणाडाळ, साखर व तेल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दिवाळीनिमित्त शासनाने रेशनकार्डधारकांसाठी पॅकेज घोषित केले आहे. या पॅकेजमध्ये 100 रुपयांमध्ये प्रत्येकी एक किलो साखर, रवा, चणाडाळ आणि तेल उपलब्ध करून देण्यात आले आहे. शासनाच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे नऊ लाख 36 हजार ‘अंत्योदय’ व ‘प्राधान्य’ रेशनकार्डधारक कुटुंबांची दिवाळी गोड होणार आहेे.

राज्य शासनाने मंगळवार (दि. 4)च्या कॅबिनेट बैठकीत अनेक निर्णय घेतले. या निर्णयांमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेशनकार्डधारक कुटुंबांना 100 रुपयांमध्ये चार वस्तू उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. रेशन दुकानांमधून दिवाळीपूर्वी हे पॅकेज वितरित केले जाणार आहे. राज्यातील 1.70 कोटी रेशनकार्डधारक कुटुंबांना म्हणजे सुमारे सात कोटी लाभार्थ्यांना त्याचा फायदा मिळणार असून, त्यांची दिवाळी प्रकाशमान होणार आहे.

दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून एका रेशनकार्डवर लाभार्थ्यांना कमी दरात 500 ग्रॅम ते एक किलोपर्यंत साखर उपलब्ध करून दिली जायची. याद्वारे गोरगरीब, गरजूंची दिवाळी गोड केल्याचे सांगत शासन स्वत:ची पाठ स्वत:च थोपटून घेते. पण, वाढती महागाई आणि रेशनवरील तुटपुंज्या साखरेमुळे दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न गोरगरिबांना भेडसावत असायचा. पण, राज्य शासनाने यंदा रेशनवर 100 रुपयांमध्ये किमान चार वस्तू उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात अंत्योदय रेशनकार्डची संख्या एक लाख 78 हजार इतकी आहे. तर लाभार्थी संख्या जवळपास सात लाख 30 हजारांवर आहे. तसेचप्राधान्य रेशनकार्डची संख्या सुमारे 7 लाख 58 हजारांच्या आसपास असून, लाभार्थी 30 लाख 34 हजार आहे. शासनाच्या निर्णयामुळे या सर्व लाभार्थींच्या दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित होणार आहे.

हेही वाचा :

The post रेशनकार्डधारकांची दिवाळी होणार गोड; शंभर रुपयांमध्ये चणाडाळ, तेल, रवा, साखर appeared first on पुढारी.