
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील अद्यापही ज्यांनी रेशनकार्डला मोबाइल लिंक केलेले नसेल, अशा लाभार्थींनी दुकानांमध्ये जाऊन ई-पाॅस मशीनवर मोबाइल क्रमांक अपडेट करावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाने केले आहे.
समाजातील गरजू व गोरगरीब जनतेला महिन्याकाठी रेशनकार्डवरून गहू व तांदूळ वितरीत केला जाताे. अंत्योदय व प्राधान्य रेशन कार्डधारकांना अवघ्या दोन व तीन रुपये प्रतिकिलोने हे धान्य वितरीत करण्यात येते. केंद्र शासनाने यंदाच्या वर्षी डिसेंबरपर्यंत मोफत धान्य वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील लाखो जनतेला या निर्णयाचा फायदा होणार आहे. राज्य शासनाने त्यापुढे जात महाराष्ट्रातील प्रत्येक लाभार्थी कुटुंबाचा मोबाइल क्रमांक हा रेशनकार्डशी जोडण्याचा निर्णय घेतला. शासनाने तशा तोंडी सूचना जिल्ह्यांना दिल्या आहेत. भविष्यात दुकानांमध्ये रेशन पोहोचल्यापासून ते धान्य घेतल्यानंतरची सर्व माहिती मोबाइलवर देण्याचा शासनाचा मानस असून त्यादृष्टीने ही तयारी सुरू असल्याचे समजते. नाशिक जिल्ह्यात सध्या रेशनकार्डची संख्या सात लाख ९३ हजार १९१ आहे. त्यामध्ये अंत्योदय कार्डची संख्या १ लाख ७८ हजार असून उर्वरित प्राधान्य रेशनकार्ड लाभार्थी आहेत. या सर्वांचे मोबाइल क्रमांक हे त्यांच्या रेशनकार्डशी जोडायचे आहेत. सद्यस्थितीत सुमारे ३० टक्के लाभार्थींनी त्यांचे मोबाइल क्रमांक लिंक केले आहेत. उर्वरित लाभार्थींनी रेशन दुकानामध्ये जाऊन ई-पॉसवर मोबाइल क्रमांक लिंक करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसीकर यांनी केले आहे.
हेही वाचा:
- नगर : एटीएममधील बॅटर्या चोरणार्यास केली अटक
- सांगली : शासनाची 60 लाखाची फसवणूक; दोघांवर गुन्हा
- नगर : कांद्याच्या माळा घालून रासपची निदर्शने ; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
The post रेशनकार्डशी मोबाइल क्रमांक लिंक करावा - नाशिक जिल्हा पुरवठा विभाग appeared first on पुढारी.