रेशन धान्याची लाभार्थ्यांकडून परराज्यातील व्यापाऱ्यांना विक्री! कमी किमतीत होतो व्यवहार 

सोनज (जि. नाशिक) : कोरोनामुळे शासनाने नागरिकांना तब्बल सात महिने स्वस्त धान्य दुकानातून नियमितपणे कमी दरातील धान्याबरोबरच मोफत धान्यपुरवठा केला. धान्य वितरण सरसकट करण्यात आले. स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य साठवून ते सध्या परप्रांतीय व्यापाऱ्यांना विकण्याचा धडाका कसमादेतील बहुतांशी नागरिकांनी लावला आहे. साठवून ठेवलेले धान्य खराब होऊ नये, म्हणून काही जण बाजार समित्यांमध्ये, तसेच स्थानिक आठवडेबाजारात मिळेल त्या किमतीत धान्य विकत आहेत. दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. 

कोरोनामुळे मे ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत नियमित धान्याबरोबरच मोफत धान्यवाटप करण्यात आले. स्वस्त धान्य दुकानातून दोन रुपये किलोने गहू व तीन रुपये किलोने तांदूळ मिळतो. कुटुंबातील प्रतिव्यक्ती पाच किलो याप्रमाणे धान्य मिळते. कोरोनात जास्त मिळालेले धान्य लाभार्थ्यांनी साठवून ठेवले. मालेगाव तालुक्यातील निम्म्यापेक्षा अधिक गावांमध्ये लाभार्थ्यांकडून धान्यविक्रीचा फंडा सुरू आहे.

मध्य प्रदेश व राजस्थानमधील व्यापाऱ्यांची अनेक पथके या भागात येऊन धान्य खरेदी करीत आहेत. पाच ते सहा जणांचा गट पिक-अप, ॲपेरिक्षा आदी वाहनांतून गावात पोचतात. चावडी, मंदिरे किंवा घरोघरी जाऊन धान्याबद्दल विचारणा केली जाते. प्लॅस्टिक टप, साड्या अथवा पैसे यांच्या मोबदल्यात धान्य खरेदी केली जात आहे. दोन महिन्यांत अनेक गावांमधून चार ते पाच वेळा अशा प्रकारची धान्य खरेदी घडून आली आहे. सोनज येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विचारणा केली असता व्यापाऱ्यांनी गावातून पळ काढला. काही लाभार्थी विविध बाजार समित्यांमध्ये तसेच आठवडेबाजारात १४ ते १५ रुपये किलोने विक्री करत आहेत. व्यापाऱ्यांवर वचक बसवीत रेशन पुरवठादारांना आणि लाभार्थ्यांना वरिष्ठ पातळीवरून योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी केली जात आहे. 

हेही वाचा  - ''पुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल''; चित्रा वाघ यांचा नाशिकच्या पत्रकार परिषदेत दावा

धान्याचा साठा अधिक झाल्याने लाभार्थ्यांकडून धान्याची विक्री केल्याचे प्रकार सध्या घडत आहेत. असे केल्याने सरकारचा मूळ हेतू साध्य न होता साठेबाजीचे प्रमाण वाढणार आहे. प्रशासनाने यावर योग्य तो उपाय करणे गरजेचे आहे. 
-भाग्येश बच्छाव, ग्रामपंचायत कर्मचारी, सोनज 

स्वस्त धान्य दुकानातून पारदर्शकपणे व ऑनलाइन प्रणालीद्वारे धान्यवाटप केले जाते. काही दिवसांपासून धान्य विक्रीचे प्रकार निदर्शनास आले आहेत. रेशन गरजूंसाठी जगण्याचे साधन असून, त्याचा विपर्यास व्हायला नको. 
-संदीप पवार, स्वस्त धान्य दुकानदार 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना