लग्नपत्रिका विक्री व्यवसायाला घरघर! विक्री १५ ते २० टक्यांवर येऊन ठेपली

नाशिक : कोरोनाच्या प्रादुर्भावाने लग्नपत्रिका विक्री व्यवसाय बंद होण्याच्या उंबरठ्यावर आला आहे. लॉकडाउनच्या काळात शंभर टक्के व्यवसाय ठप्प होता. अनलॉकनंतर लगीनसराई सरकारने घालून दिलेल्या बंधनामुळे शंभर टक्क्यावरील विक्री १५ ते २० टक्यांवर येऊन ठेपली असल्याची खंत विक्रेत्यानी व्यक्त केली. 

लग्नपत्रिका विक्री व्यवसायाला घरघर 
जानेवारी ते मे हा महिना लगीनसराईचा काळ असतो. या दिवसात लग्नपत्रिका व्यवसाय तेजीत असतो. मार्चपासून देशातही रुग्ण आढळल्याने केंद्र सरकारतर्फे संपूर्ण देशात लॉकडाउन घोषित केला होता. लगीनसराई, तर दूर घराच्या बाहेर पडण्यावरदेखील बंदी होती. अशा वेळेस व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला होता. लगीनसराईच्या निमित्ताने खरेदी केलेला माल पडून होता. प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने सरकारतर्फे अनलॉक करण्यात आला. त्यानंतरही दोन महिने गर्दी जमावास बंदी होती. ऑगस्टपासून लग्नात ५० जणांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली. कुठेतरी लगीनसराईस सुरुवात झाल्याने समाधान वाटत होते. ते फार काळ टिकले नाही.

हेही वाचा > तरुणाकडून धक्कादायक वस्तू सापडताच पोलीसही हैराण! युवावर्गाला सहज मिळणाऱ्या गोष्टीचा लावणार शोध?

व्यवसायावर मोठा परिणाम

छोट्याखानी विवाह सोहळा करायचा मग पत्रिकेची काय आवश्‍यकता, असा समज झाला. ५० जणांना निमंत्रण देण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून निमंत्रण देण्यात आले. त्यानंतर एक ते दीड महिन्यापासून लग्नपत्रिका खरेदीकडे नागरिक वळू लागले आहेत. त्याचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. विवाह प्रमाणपत्र पुरावा तसेच विवाह नोंदणी तसेच मानपानासह देवपूजेसाठी केवळ १०० ते २०० लग्नपत्रिका नागरिकांकडून खेरीदी केल्या जात आहेत. पूर्वी याचे प्रमाण कमीत कमी एक हजारावर होते. जिल्‍ह्याबाहेरून येणारी मागणीही घटल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. लॉकडाउनमुळे झालेले आर्थिक नुकसान, मंदीत आलेले व्यवसाय तसेच सोशल मीडियाचा ट्रेंड यामुळे लग्नपत्रिका व्यवसायावर एक प्रकारची संक्रांतच आल्याचे भासत आहे. 

जोडधंद्याची वेळ 
लग्नपत्रिका व्यवसायावर असलेले मंदीचे सावट बघता पूर्वी पत्रिकेच्या व्यवसायातून वेळ काढणे शक्य होत नव्हते. सध्या त्यांच्यावर शालेय स्टेशनरी विक्रीसह विविध प्रकारचा जोडधंदा सुरू करण्याची वेळ आली आहे. केवळ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे. 

हेही वाचा > एकच व्यवहार आणि जर्मनीला उच्च शिक्षण घेण्याचे तरुणाचे स्वप्न क्षणार्धात भंगले! 

कोरोना प्रादुर्भाव आणि सोशल मीडियावरून निमंत्रण देण्याच्या वाढत्या ट्रेंडमुळे लग्नपत्रिका विक्री व्यवसाय आटोक्यात येऊ पाहत आहे. 
- रेखा सोमवंशी (लग्नपत्रिका विक्रेता)