लग्नसराईत सोनं कसं घेऊ? विवाह सोहळ्याच्या हंगामात सराफ बाजारावर नामुश्‍की

नाशिक : विवाहसोहळे सराफ व्यावसायिकांसाठी पर्वणी असते. या हंगामात होणाऱ्या व्यवसायावर त्यांचा वर्षाचा व्यवहार अवलंबून असतो. मार्च, एप्रिल, मे हे तीन महिने हंगामाचे असतात. सराफ बाजार फुलून निघतो. गेल्या दोन वर्षांपासून सलग त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे.

सराफ व्यावसायिकांसह व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने लागू केलेल्या नवीन नियमावलीमुळे जीवनावश्‍यक, तसेच अत्यावश्‍यक दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने बंद करण्यात आले आहे. त्यात सराफ बाजाराचादेखील समावेश आहे. विवाह सोहळ्याच्या हंगामात नेमके लॉकडाउन केल्याने सराफ व्यावसायिकांसह व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. 

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश

लग्नसराईत सराफ व्यवसाय ठप्प 
‘ब्रेक द चेन’च्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या मिनी लॉकडाउनचा मंगळवारी (ता. ६) पहिलाच दिवस होता. व्यापारी बाजारपेठांसह सराफ बाजारदेखील बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. या वर्षी गेल्या वर्षात झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न सराफ व्यावसायिक करत होते. त्यांना आशा होती नुकसान भरून निघेल. यंदाही नेमक्या हंगामात पुन्हा लॉकडाउन केल्याने त्यांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. मंगळवारी संपूर्ण बाजारपेठ बंद होती. जीवनावश्‍यक वस्तूंना बंदमधून वगळल्याने सराफ बाजाराचा ताबा भाजी विक्रेत्यांनी घेतलेला दिसले. सराफी बंद दुकानांबाहेर अनेक भाजी विक्रेत्यांनी दुकाने लावल्याचे चित्र दिसून आले. 

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ

सध्या हंगामाचा दिवस आहे. सलग इतक्या दिवस व्यवसाय बंद राहिल्याने मोठे नुकसान होणार आहे. तरी सराफ व्यावसायिकांकडून सरकारला विनंती आहे, की लॉकडाउनमधून सवलत द्यावी. निर्बंध कडक करावे आणि दुकान सुरू, बंद ठेवण्यात बदल करावे. -गिरीश नवसे, अध्यक्ष- दि नाशिक सराफ असोसिएशन