लग्नाला परवानगी; पण वधू-वरांना कपडे घ्यायचे कोठून? वधू-वर पित्यांना प्रश्न

चिचोंडी (जि.नाशिक) : ‘ब्रेक द चेन’असे राज्य शासनाने जाहीर करून सध्या निर्बंध घातले आहे. मात्र, यामध्ये नियम लावतांना अनेक व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना केल्या. यामध्ये कपडे, भांडी, स्टेशनरी, स्पेअर पार्ट, सिमेंट, ज्वेलरी, स्टील, फर्निचर आदींचा बंदमध्ये समावेश आहे. दुसरीकडे लग्नासाठी ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी असल्याने आता वधू-वरांना कपडे, भांडी, दागिने कुठे घ्यावी, कशी घ्यावी हा प्रश्‍न वधू-वर पित्यांना सतावतो आहे. 

वधू-वर पित्यांना प्रश्न
आज एका विवाहात नवरदेवाला आपल्या मित्राच्या ब्लेझर ड्रेसवर लग्न उरकावे लागले. तसेच, राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’ निर्णयात खासगी बांधकामे, सरकारी बांधकामे सुरूच राहतील, असे म्हटले आहे. मात्र, ही बांधकामे करताना स्टील, सिमेंटची दुकाने बंद केल्याने नेमके बांधकाम कसे करावे, असाही प्रश्‍न निर्माण होत आहे. त्या मुळे शासनाने ‘ब्रेक द चेन’मधील नियमांचा फेरविचार करावा, अशी मागणी होऊ लागली आहे. 

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश

‘ब्रेक द चेन’ नियमात शिथिलता आणण्याची मागणी 
सर्वसामान्य छोटे-मोठे दुकानदारांना या नियमांचा फटका बसत असून, या नियमांमध्ये बदल करावा, अशी मागणी आता सोशल मीडियातून होऊ लागली आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू करण्यास आठवड्यातील पाच दिवस तरी परवानगी देण्यात यावी, असा संतप्त सूर आता उमटू लागला आहे.  

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ