लग्न बस्त्यासाठी गिरणारेत तोबा गर्दी; पोलिसांच्या हस्तक्षेपाने धावपळ

गिरणारे  ( जि. नाशिक) : गुडीपाडव्याच्या दिवशी आदिवासी भागातून बस्त्यांच्या खरेदीसाठी गिरणारे गावात तोबा गर्दी झाली. भरगच्च गर्दीत अनेकांनी मास्क घातलेला नव्हता. लहान मुले, वयस्कर माणसे, महिलांची मोठी गर्दी सूचना देऊनही आटोक्यात येत नसल्याने अखेर पोलिसांनी ही गर्दी हटवण्यासाठी हस्तक्षेप केल्याने धावपळ उडाली. 

लग्नकार्य खरेदीसाठी गिरणारेच्या आदिवासी पट्ट्यातील बस्त्यांची गर्दी वाढत असल्याने स्थानिक व बाजारात आलेल्या लोकांच्या जीवाला धोका असल्याने यापुढे होणारी गर्दी थांबवा, अशी मागणी सुजाण नागरिकांनी केली आहे. गिरणारे आठवडे बाजाराचे गाव आहे. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात आदिवासी खेडे पाडे आहेत. या भागातील मोठी बाजारपेठ असल्याने गिरणारे नेहमी गजबजलेले असते. कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव या भागात दिवसागणिक खूप प्रमाणात वाढत आहे. ऐन सणाच्या दिवशी गिरणारेच्या बाजारात मोठी गर्दी होती. पोलिसांनी थेट गर्दी पांगवली यामुळे मोठी धावपळ उडाली होती. गावागावात टेम्पो, जीप भरून लोक बस्त्यांना येतात. मात्र सोबत गावातील अनेकांना बोलावतात. ही प्रथा मात्र कोरोनाच्या स्थितीत धोकेदायक ठरत आहे. याला अटकाव घाला अशी मागणी करण्यात आली आहे. 

कोरोना ग्रामीण भागात फैलावत असताना आदिवासी भागातून गिरणारे, हरसूलला तोबा गर्दी होणे मोठी धोक्याची घंटा आहे. यामुळे कोरोना संसर्ग वाढेल, याचे भान लोकांनी ठेवले पाहिजे. आम्ही जागृती करतो, मात्र अनिष्ठता लोक सोडत नाही हेच दुर्दैव आहे. 
- देवचंद महाले, पोलिसपाटील, गणेशगाव (वाघेरा).