लग्न सोहळ्याला पोहोचताच त्यांच्यासोबत घडला प्रकार; काही क्षणांतच आनंदावर विरजण

नाशिक : नातेवाईकांच्या लग्न संमारंभासाठी शेळके कुटुंब विवाहस्थळी आले होते. गाडीतून खाली उतरुन ते जरावेळ बाजूला थांबले. कुटुंब बोलण्याच्या नादात असतांनाच त्याने साधला डाव अन् काही सेकंदात घडला प्रकार. लग्नकार्याच्या ठिकाणी घडलेल्या प्रकाराने भरसभामंडपात एक चर्चा. वाचा नेमके काय घडले?

अशी घडली घटना

रविवारी (ता. 10) रोजी सायंकाळी गंगापूररोड येथे राहणाऱ्या वैभवी विश्वनाथ शेळके या पती व मुलांसोबत नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यासाठी आल्या होत्या. आडगाव शिवारातील औरंगाबादरोडवर एका लॉन्समध्ये हा विवाह सोहळा पार पडणार होता. नुकतेच विवाहस्थळी पोहचून ते कुटुंब रस्त्याच्या कडेला उभे होते. तेवढ्यात मागून आलेल्या काळ्या रंगाचा शर्ट परिधान करून काळ्या रंगाच्या पल्सरवर आलेल्या एका भामट्याने शेळके यांच्याजवळ येऊन त्यांच्या गळ्यातील पाच तोळे वजनाचे मनी मंगळसूत्र, सोन्याची एक तोळे चैन, व एक तोळ्याचे सोन्याचे गंठन ओरबाडून नेले. काही सेकंदातच घडलेल्या या प्रकाराने तिथे मोठी गर्दी झाली होती. याबाबत आडगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध जबरी लूट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

सोनसाखळी चोर एकच असल्याचे स्पष्ट

गेल्या काही दिवसांपासून शहरात सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच आहे. तरीही पोलिस प्रशासनाला सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळण्यास उघडपणे अपयश येत आहे. शहरात घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनेत चोरट्याने काळ्या रंगाची दुचाकी वापरण्याबरोबर काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला असल्याचे निष्पन्न झाले होते. पुन्हा त्याच भामट्याकडून सोनसाखळी चोरीचे कृत्य केले जात असल्याने सोनसाखळी चोर एकच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा