लय भारी! पत्नी सरपंच तर पती उपसरपंच, नाशिकमधील ‘या’ ग्रामपंचायतीचा निकाल

पत्नी सरपंच, पती सरपंच,www.pudhari.news

दिंडोरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा 

दिंडोरी – तालुक्यातील जऊळके दिंडोरी ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंच हे दोन्ही पदे एकाच घरात आली आहेत. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारती जोंधळे तर उपसरपंचपदी त्यांचे पती तुकाराम जोंधळे यांची निवड झाली आहे. एकाच घरात दोन्ही पदे आल्याने जिल्हाभरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत थेट सरपंच पदी भारती तुकाराम जोंधळे यांची अगोदरच निवड झाली होती. तर तुकाराम जोंधळे यांच्या गटाचे चार सदस्य तर विरोधी शांताराम जोंधळे यांच्या गटाचे 5 सदस्य निवडून आले होते. आज झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत शासकीय अध्यादेशानुसार थेट निवडून आलेल्या सरपंचाला पहिल्या फेरीत एक व समसमान झाल्यावर निर्णायक मत देण्याचा अधिकार देण्यात आला होता. या अध्यादेशाचा तुकाराम जोंधळे गटाला लाभ झाला आहे. उपसरपंच पदी पहिल्या फेरीत समान मते झाल्याने सरपंच भारती जोंधळे यांच्या निर्णायक मताने तुकाराम जोंधळे यांची उपसरपंच पदी निवड झाली.

एकाच घरात सरपंच व उपसरपंच पद आल्याने तुकाराम जोंधळे यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. निवडणुकी प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अंबाबाई बागुल, अरुणा वाघ,  कुणाल बागुल, खंडू गोतरणे, आशा गांगुर्डे, उषा जोंधळे, रूपाली उजे, ग्रामसेवक हिरालाल पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post लय भारी! पत्नी सरपंच तर पती उपसरपंच, नाशिकमधील 'या' ग्रामपंचायतीचा निकाल appeared first on पुढारी.