नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा ; शिंदे गावात एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या कारखान्यात मुंबईतील साकीनाका पोलिसांनी रविवारी (दि. २२) सकाळीच भेट देऊन पाहणी केल्याचे समोर आले आहे. यावेळी कारखान्यात काम करणाऱ्या रोहितकुमार चौधरी (३१, रा. वसई) याच्यासह ड्रग्ज माफिया ललित पानपाटील-पाटील सोबत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र याबाबत कोणताही पुरावा किंवा पोलिसांनी दुजोरा न दिल्याने ललितच्या स्पॉट व्हिजिटबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी भूषण पानपाटील-पाटील, अभिषेक बलकवडे व इतर संशयितांनी शिंदे गावात कारखाना तयार केल्याची बाब मुंबई पोलिसांच्या कारवाईत उघड झाली. दरम्यान, पुणे पोलिसांनी भूषण व अभिषेक यांना उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतले, तर ललितला मुंबई पोलिसांनी बंगळुरू येथून ताब्यात घेतले. एमडीवरून राजकारणही तापलेले असताना पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी संशयितांची धरपकड सुरू करीत पुरावे गोळा करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार पुणे पोलिस गत रविवारी (दि. १५) शिंदे गावातील कारखान्यात भूषण पाटीलला घेऊन आले होते. त्यानंतर रविवारी (दि. २२) सकाळीच मुंबईतील साकीनाका पोलिसांचे पथक शिंदे गावातील कारखान्यावर येऊन गेल्याची बाब समोर आली. मात्र यात पोलिसांसोबत ललित असल्याची चर्चा रंगली होती. तसेच पोलिसांनी शिंदे गावातील कारखान्यासह ललितच्या निवासस्थानी पाहणी केल्याचे बोलले जात होते. मात्र यास मुंबई किंवा नाशिक पोलिसांनी दुजाेरा दिलेला नाही. त्यामुळे मुंबई व नाशिक पोलिसांमधील असमन्वयही समोर आला आहे. या कारखान्यात रोहितकुमार चौधरीने एमडी तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरवल्याचे तसेच एमडी तयार केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे साकीनाका पोलिसांनी रोहितकुमारला दिल्लीतून ताब्यात घेतले होते. तपासाच्या दृष्टीने रोहितकुमारला रविवारी कारखान्यात आणून पंचनामा केला.
शिंदे गावात रविवारी ड्रग्ज कारखान्याच्या तपासणीसाठी मुंबई पोलिसांचे पथक आले होते. याविषयी कल्पना होती. या प्रकरणातील चौधरी नावाच्या संशयिताला घेऊन पोलिस घेऊन येणार असल्याची नोंद आमच्याकडे आहे. मात्र ललितबाबत कोणतीही कल्पना नाही.
– रामदास शेळके, पोलिस निरीक्षक, नाशिकरोड
हेही वाचा :
- पोलिसांनी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून जाळे वाढवावे : सुधीर मुनगंटीवार
- Gold Rate : यंदा सोने लुटताना बसेल खिशाला झळ; दर ६२ हजारांच्या नजीक
- Navratri 2023 : अंगणवाडी पर्यवेक्षिकेकडून नवरात्रोत्सवात प्रबोधनाचा जागर
The post ललितच्या 'स्पाॅट व्हिजिट'वर साशंकता appeared first on पुढारी.