लवकरच करणार महिला पोलिस पथकाची निर्मिती – पोलिस आयुक्त दीपक पांडे

सिडको (जि.नाशिक) : महिलाची सुरक्षितता लक्षात घेता महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त कार्यालयाकडून महिला पोलिस पथकाची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी दिली. शनिवारी (ता.६) अंबड पोलिस ठाण्याला त्यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी तपासणी केली, तसेच पोलिसांचे प्रश्न समजून घेतले. 

महिला पोलिस पथकाची निर्मिती करणार
अंबड पोलिस ठाणे हद्दीतील लोकप्रतिनिधी व शांतता कमिटीचे सदस्य यांची एकत्रित बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. या वेळी बोलताना पांडे यांनी नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून, गुन्हेगारी रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. अंबडचे वरिष्ठ निरीक्षक कुमार चौधरी यांच्या कामाची देखील त्यांनी प्रशंसा केली. भविष्यात पोलिसांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी आपण व वैयक्तिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांचे प्रश्न समजून घेतले. 

या वेळी उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ निरीक्षक कुमार चौधरी, निरीक्षक कमलाकर जाधव, निंबाळकर तसेच आमदार सीमा हिरे, शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, सभापती चंद्रकांत खाडे, नगरसेवक राकेश दोंदे, सुवर्णा मटाले, भाग्यश्री ढोमसे, राजेंद्र महाले, किरण गामणे, समता परिषदेचे संतोष सोनपसारे व शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते.