नाशिक : जिल्ह्यातील एक हजार ९७८ महसूल गावांपैकी एक हजार ९७५ गावांचे सातबारा ऑनलाइन उपलब्ध आहेत. उर्वरित तीन गावांसंदर्भात असलेल्या तांत्रिक अडचणी शासनस्तरावर दूर करून लवकरच ती गावेही ऑनलाइन सातबारा प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात येतील, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
आठवडाभरात रुग्णवाढीचा अंदाज
थोरात म्हणाले, की वाढणारी थंडी आणि दिवाळीच्या कालावधीत बाजारपेठांमध्ये झालेली गर्दी लक्षात घेता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळे येत्या पाच-सहा दिवसांत रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे; जिल्हा प्रशासनाने याबाबत योग्य ती काळजी घ्यावी. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ सर्वेक्षण मोहिमेमध्ये जवळपास अडीच लाख को-मॉर्बिड जिल्ह्यात सापडले असून, त्यांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्याच्या सूचना थोरात यांनी दिल्या.
हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी
रेमडेसिव्हिर आणि ऑक्सिजनचा पुरवठादेखील उपलब्ध
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सातबारा संगणकीकरण, जिल्ह्यातील १०१ सेवांचा समावेश असलेल्या सेवाहमी कायद्याची कार्यवाही, कोविड संभाव्य दुसऱ्या लाटेसंदर्भातील प्रशासनाची पूर्वतयारी, महाराजस्व अभियान कार्यवाहीची माहिती दिली. विविध प्रकरणांमध्ये टपालाद्वारे नोटीस बजावण्यासाठी होणारी दिरंगाई टाळण्यासाठी जिल्ह्यात व्हॉट्सअॅपद्वारे नोटिसा पाठविण्याच्या उपक्रमाची माहिती दिली. जिल्ह्यात कोरोना मृत्युदर १.६५ टक्के, तर रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्के आहे. मृत्युदराबाबत राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ३० वा क्रमांक आहे. काही संसर्गबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. जिल्ह्यात रेमडेसिव्हिर आणि ऑक्सिजनचा पुरवठादेखील मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचेही स्पष्ट केले.
हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत थोरात बोलत होते. आमदार हिरामण खोसकर, सरोज आहिरे, डॉ. सुधीर तांबे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, उपायुक्त अर्जुन चिखले, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, वासंती माळी, तहसीलदार राजेंद्र नजन, अनिल दौंड, रचना पवार आदी उपस्थित होते.