लसीकरण करा, पण परवानगी द्या! कठोर निर्बंधामुळे सलून व्यावसायिकांची आर्थिक कोंडी

नाशिक : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने चित्रपटगृह, नाट्यगृहांसह सलून दुकानेही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या मुळे सलून व्यावसायिकांना आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. आमच्याही जिवाला धोका आहेच. त्या मुळे नियमावलीत चालक, होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण आवश्यक केले आहे. त्याच धर्तीवर सलून व्यावसायिकांनाही लसीकरण करून व्यवसायासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी सलून व्यावसायिकांनी केली आहे. 

कोरोनामुळे गेल्या वर्षभरात मोठे आर्थिक नुकसान व्यावसायिकांचे झाले. या मुळे जगणे अवघड झाले आहे. चार आठवड्यांपासून नाशिकमध्ये वीकेंड लॉकडाउनची अंमलबजावणीबरोबर सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत व्यवसाय करण्याची परवानगी दिली होती. मात्र, राज्य सरकारने निर्बंध कडक केल्यामुळे सलून पार्लर व्यावसायिकांबरोबर दुकानात काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. कोरोना नियमांचे पालन करत आतापर्यंत व्यवसाय सुरू होता. नाशिक शहरात चाळिशीच्या आतील तरुण मंडळी सलून व्यवसाय करतात. त्या मुळे त्यांच्यासमोर मोठा रोजगाराचा प्रश्‍न उभा राहिला आहे. पहिल्या लॉकडाउनमध्ये सलून व्यावसायिकांना कुठल्याही आर्थिक मदत दिली नव्हती. त्यातच आता पुन्हा व्यवसाय बंद ठेवावा लागणार असल्यामुळे नुकसान होणार असून, सरकारने आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा सलून व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. 

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

ग्राहकांची काळजी घेणे ही आमची प्राथमिकता आहे. त्या मुळे दुकानात वेळोवेळी सॅनिटायझर करतो. ग्राहकांना अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय बोलवत नाही. दुकानात पाचपेक्षा अधिक ग्राहकांना बसवत नाही. ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे उपासमारीची वेळ येणार आहे. 
-नीलेश चित्ते, संचालक, फर्स्ट इम्प्रेशन सलून 

नाभिक समाजातील सलून व्यावसायिकांवर सरकारच्या निर्णयाने उपासमारीची वेळ आली आहे. लग्नसराई कमी झाल्यामुळे व्यवसाय ३० टक्क्यांवर आला आहे. नाभिक महामंडळाची बैठक झाली असून, त्यात दुकान सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 
-नाना वाघ, शहराध्यक्ष, नाभिक महामंडळ 

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी