मुखेड (जि. नाशिक) : चांगले उत्पन्न मिळेल, या आशेवर शेतकरी द्राक्षबागांना महागडी खते, औषधे व फवारणी करतो. मेहनत घेवूनही निसर्गापुढे हतबल होण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. त्यामुळे जो शेतकरी द्राक्षबाग काढून टाकतो, तो पुन्हा द्राक्षबागेचे नाव घेत नाही, हे वास्तव आहे.
मुखेड, जळगाव नेऊर, पुरणगाव, पिंपळगाव लेप, नेऊरगाव व परिसरातील गावांमध्ये द्राक्ष पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यात लाखो रूपये खर्च केलेल्या बागा अवकाळीने संकटात सापडल्या. द्राक्षाचे आगर यामुळे धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जळगाव नेऊरच्या शेतकऱ्यावर नामुष्की
कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना करूनही पाच वर्षांपासून दोन एकर द्राक्ष बागेतून उत्पन्न मिळत नसल्याने जळगाव नेऊर (ता. येवला) येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी जयाजी शिंदे यांनी द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालविण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकवेळी निसर्गाची साथ मिळत नसल्याने शिंदे कुटुंबाला उत्पादन खर्च जास्त, तर उत्पन्न कमी याचा प्रत्यय वारंवार येत असल्याने शुक्रवारी (ता.१९) द्राक्षबाग तोडण्यास सुरूवात केली.
हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ
लाखो रूपयांचे कर्ज कसे भरायचे?
मागीलवर्षी कोरोनामुळे मातीमोल भावाने द्राक्ष विकण्याची वेळ उत्पादकांवर आली होती. यावर्षी अवकाळीचा फटका निर्यातक्षम द्राक्षांना बसणार आहे. कमी - अधिक द्राक्ष क्षेत्र असलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. अशी परिस्थिती कायम राहीली तर द्राक्ष उत्पादकांनी कसे जगायचे, केलेला वारेमाप खर्च वसूल होईल का, उत्पन्नाअभावी घेतलेले लाखो रूपयांचे कर्ज कसे भरायचे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
हेही वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय
कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, मागीलवर्षी कोराना यामुळे सलग पाच वर्षापासून दोन एकर द्राक्ष बागेपासून उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी विसंगती होत आहे. द्राक्षबागेसाठी घेतलेले कर्ज फेडायचे कसे. त्यामुळे कुटुंबाने एकत्रित निर्णय घेवून तळहाताच्या फोडाप्रमाणे दहा वर्ष जपलेली द्राक्ष बाग काढण्याचा निर्णय आमच्या कुटुंबाने घेतला.
- बबन शिंदे, शेतकरी, जळगाव नेऊर