लाचखोर मनपा सहाय्यक आयुक्तांच्या घरझडतीत 20 लाखांचे घबाड जप्त

मालेगाव (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – येथील महापालिका क्षेत्रातील गटार कामाचे देयके (बिल) मंजूर करुन त्यापोटी चार टक्के प्रमाणे संबंधित ठेकेदाराकडून 33 हजार रूपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी शुक्रवारी (दि.21) सायंकाळी मनपा आयुक्तांचे स्वीय सहाय्यक तथा मनपाचे सहाय्यक आयुक्त सचिन सुरेंद्र महाले (51, रा. वर्धमाननगर, कॅम्प) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरूद्ध किल्ला पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाने सापळा रचून ही कारवाई केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार हे बांधकाम ठेकेदार आहेत. महापालिकेत गटार बांधकामाचे टेंडर तक्रारदार यांच्या भावाच्या नावाने घेतले होते. मनपाच्या नियमाप्रमाणे काम पूर्ण करुन नाला बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी संशयित आरोपी महाले यांची तक्रारदार यांनी भेट घेतली. यावेळी आयुक्तांचे स्वीय सहाय्यक असलेल्या महाले यांनी तक्रारदारावर प्रभाव टाकला. बिल मंजूर करू देतो असे सांगून बिल मंजूर झाल्यानंतर चार टक्के प्रमाणे पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. तक्रारदार यांनी या प्रकरणी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.21) सायंकाळी महापालिकेच्या मुख्यालयात 33 हजार रूपयांची लाच पंचांसक्षम महाले यांनी स्विकारली. यावेळी पथकाने महाले यांना ताब्यात घेवून शासकीय विश्राम गृहावर रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी केली.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने महाले यांच्या घराची झडती घेतली असता तब्बल 13 लाख 10 हजार 200 रुपयांची रोकड तर सोन्याचे तीन कॉईन व सोन्याचा एक तुकडा असे 133 ग्रॅम वजनाचे सुमारे सात लाख रूपयांचे सोने पथकाने जप्त केले आहे. या प्रकरणी लाचलुचपत पथकाने तपासाची चक्रे गतीमान केली आहेत. बँक खात्यासह इतर स्थावर व जंगम मालमत्तेची चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक गायत्री जाधव, पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत, पोलिस हवालदार संदीप वडनेरे, ज्योती शार्दूल, परशुराम जाधव आदींच्या पथकाने केली.

हेही वाचा: