लाल कांदा भावात उसळी! घसरणीला पहिल्या दिवशी लागला ‘ब्रेक’ 

नाशिक : नवीन लाल कांद्याच्या भावात मागील आठवड्यात क्विंटलला ३०० ते ६०० रुपयांनी घसरण झाली होती. त्यामुळे आजच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी भावाची नेमकी स्थिती काय राहणार, याबद्दलची उत्सुकता शेतकऱ्यांमध्ये होती. भावातील घसरणीला ‘ब्रेक’ लागला. त्याचवेळी भावात १०० ते ६०० रुपयांनी उसळी घेतली. त्यातून क्विंटलचा भाव पुन्हा साडेतीन हजार रुपयांकडे झेपविण्यास मदत झाली. 

आंदोलनाच्या झळा स्थानिक पातळीपर्यंत पोचल्या
मागील आठवड्यात साडेतीन हजारांपर्यंत पोचलेले कांद्याचे भाव अडीच हजार ते सत्तावीसशे रुपयांपर्यंत घसरले होते. भावातील घसरणीचा ‘ट्रेंड’ कायम राहिल्यास शेतकऱ्यांच्या नाराजीचा सूर वाढणार, अशी चिन्हे दिसत होती. सध्या केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या झळा स्थानिक पातळीपर्यंत पोचल्या आहेत. अशा परिस्थितीत कांद्याचे भाव आणखी घसरत राहिल्यास शेतकरी रस्त्यावर उतरण्याची शक्यता अधिक होती.

हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

किमान पंधरा दिवसांचा कालावधी

मुळातच, कांदा उत्पादक नसलेल्या राज्यात क्विंटलचा भाव साडेतीन हजार ते चार हजार रुपयांच्या पुढे पोचलेला आहे. अजूनही नवीन लाल कांद्याची आवक देशांतर्गत वाढण्यासाठी आणखी किमान पंधरा दिवसांचा कालावधी बाकी आहे. अशावेळी भावात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांना हे का घडले, असा प्रश्‍न भेडसावू लागला होता. व्यापाऱ्यांनीसुद्धा या महिन्याअखेरपर्यंत कांद्याचे भाव कमी होणार नाहीत, असा अंदाज यापूर्वीच वर्तविला होता. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

मनमाडमध्ये सर्वांत कमी भाव 
जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये आज कांद्याचे भाव क्विंटलला सरासरी तीन हजार ते तीन हजार ४२० रुपयांपर्यंत पोचले आहेत. अशा परिस्थितीत मनमाडमधील भाव अपवाद राहिला. जिल्ह्यात सर्वांत कमी म्हणजे, सरासरी क्विंटलला दोन हजार ८०० रुपये असा भाव मनमाडमध्ये शेतकऱ्यांना मिळाला आहे. गेल्या आठवड्यात दोन हजार ७०० रुपये क्विंटल या सरासरी भावाने शेतकऱ्यांनी कांद्याची विक्री केली होती. 

कांद्याच्या भावाची स्थिती 
(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये) 

बाजारपेठ सोमवार (ता. ८) मागील आठवड्यात 
येवला तीन हजार २५० दोन हजार ६०० 
लासलगाव तीन हजार ४२० दोन हजार ८५१ 
मुंगसे तीन हजार २५० दोन हजार ८५० 
कळवण तीन हजार ४५० दोन हजार ९०० 
चांदवड तीन हजार दोन हजार ९०० 
सटाणा तीन हजार १५० दोन हजार ८५० 
देवळा तीन हजार १०० दोन हजार ९०० 
पिंपळगाव तीन हजार ३५१ दोन हजार ६५१