लासलगावी हंगामातील पहिलाच उन्हाळ कांदा दाखल; दरवर्षीच्या तुलनेत आवक घटली

लासलगाव (जि. नाशिक) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उन्हाळ कांद्याचे आगमन झाले. लाल कांद्यासोबत बाजार समित्यांमध्ये अल्प प्रमाणात उन्हाळ कांदा विक्रीस आला आहे. उन्हाळ कांद्याला कमाल ३९०३ रुपये, तर लाल कांद्याला कमाल ४१३० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. या हंगामातील पहिलाच उन्हाळ कांदा बाजारात दाखल झाला. 

कांद्याच्या आगारात झालेल्या अवकाळी पावसामुळे यंदा खरीपाच्या कांद्याचा उतारा अत्यंत कमी येऊन दरवर्षीच्या तुलनेत उत्पादन जवळपास निम्म्यावर आले. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये कांदा आवक घटली असून, क्विंटलचे सर्वसाधारण दर ३ हजार ५०० रुपयांवर आहेत. आशिया खंडातील प्रथम क्रमांकाची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याची दररोजची आवक साधारण २२ ते २५ हजार क्विंटल होत आहे. ती आता ८ ते १० हजार क्विंटलवर आली आहे. परिणामी, मागणी आणि पुरवठा यामधील गणित विस्कटल्याने घाऊक बाजारात कांदा साडेतीन हजार रुपये क्विंटलने विक्री होत आहे. 

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय

दरातून झालेला खर्चही निघेना

पावसाळ्यात लागवड केलेला कांदा परतीच्या पावसाने धुऊन नेल्याने शेतकऱ्यांकडील महागडे बियाणे वाया गेले. पुन्हा कांदा लागवड करण्यासाठी बाजारातून बियाणे विकत आणली गेली. मात्र, बियाणे निकृष्ट निघाल्याने त्याचा लागवडीवर परिणाम झाला. मोठा खर्च करूनही अनेक शेतकऱ्यांचे कांद्याचे अपेक्षित उत्पन्न हाती न आल्याने मिळणाऱ्या दरातून झालेला खर्चही निघत नसल्याचे शेतकरी सांगत आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला किमान १५००, कमाल ३९०३ तर सरासरी ३५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर, लाल कांद्याला किमान १२००, कमाल ४१३०, तर सरासरी ३८७० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. 

कांदा दर वाढण्यामागील कारण... 

कांदा आगारात अवकाळी पाऊस झाला. त्यामध्ये कांद्याची शेती खराब झाली. त्यामुळे बाजारातील पुरवठा घटून त्याचा थेट परिणाम कांदा दरावर झाला. तसेच बोगस बियाणामुळे पिकांचे नुकसान झाल्याने बाजारपेठेत जवळपास ५० टक्क्यांनी हा पुरवठा कमी झाला आहे. आणखी एक कारण म्हणजे वाढलेले डिझेलचे दर, ज्याचा परिणाम कांदा वाहतुकीवर होत आहे.  

हेही वाचा - नियतीने पुन्हा तिचे बाळ 'तिच्या' झोळीत टाकले! मातेचे कोरडे पडलेले डोळे पुन्हा पाणावले