लासलगाव जिल्हा परिषद सदस्य जगताप यांच्यावर प्राणघातक हल्ला 

लासलगाव (जि. नाशिक) : लासलगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य डी. के. जगताप यांच्यावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यातून ते बचावले असून, त्यांना उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. लासलगाव पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून, सोमवारी (ता. २२) सायंकाळी नाशिकचे काम आटोपून डी. के. जगताप व प्रकाश दायमा त्यांच्या मालकीच्या थेटाळे येथील फार्महाउसवर जेवण करून घरी परतत होते. त्यादरम्यान गेटवर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. 

तोंडाला रुमाल बांधलेल्या अज्ञातांकडून हल्ला

डी. के. जगताप फोर्ड इंडीओर (एमएच १५, एचसी ८५८५)ने घरी परतत असताना गेटजवळ येताच गेट का बंद होत आहे, म्हणून गाडीची काच खाली घेत असताना अज्ञाताने त्यांच्यावर काठीने जोरदार हल्ला केला. त्यात जगताप यांच्या उजव्या बाजूकडील मान व डोक्याला जबर जखम झाली. याच वेळेस पाठीमागून तोंडाला रुमाल बांधलेले हातात काठ्या घेऊन चार ते पाच जण चाल करून आले. घटनेचे गांभीर्य ओळखून जगताप यांनी गाडी वेगात सुरू करून गेट उघडण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा जोरदार धडक देऊन गेट उघडून लासलगावकडे वेगात गाडी काढली. काही अंतर अज्ञातांनी त्यांचा पाठलाग केला. नंतर ते अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. त्यांना तातडीने लासलगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार घेऊन त्यांना तातडीने नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची तब्येत स्थिर आहे. 

 हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

निफाडचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगावचे सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ व उपनिरीक्षक सोनवणे यांनी तातडीने पथक रवाना केले. पथकाने पाच ते सहा व्यक्तींना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. लवकरच मुख्य गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या जातील, असे निफाड ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांनी सांगितले. 

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ