लासलगाव बाजार समिती आजपासून १२ दिवस बंद

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा; दीपावलीनिमित्त कांदा विभागातील व्यापारी लिलावात सहभागी होणार नसल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कांदा बाजार आवार हे मंगळवार (दि. ७) ते दि. १८ नोव्हेंबर असे 12 दिवस बंद राहणार आहे. याबाबतचे पत्र लासलगाव मर्चंट असोसिएशने बाजार समिती प्रशासनाला दिले आहे. ऐन सणासुदीत कांदा लिलाव बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांची अडचण होणार आहे.

लासलगाव मर्चंट असोसिएशनच्या कांदा व धान्य विभागातील व्यापारी वर्गाच्या पत्रावरून मंगळवार (दि. 7) पासून दि. 18 नोव्हेंबरअखेर दीपावलीनिमित्त कांदा विभागातील व्यापारी लिलावात सहभागी होणार नाहीत. तसेच शुक्रवार (दि. 10) ते दि. 18 नोव्हेंबरअखेर धान्य विभागातील व्यापारी वर्ग हे धान्य या शेतीमालाचे लिलावात सहभागी होणार नसल्याने लासलगाव मुख्य बाजार आवारावरील कांदा व धान्य या शेतीमालाचे लिलाव बंद राहतील. दरम्यान लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात घसरण सुरू आहे. दि. २७ ऑक्टोबर रोजी उन्हाळी कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल ५३०० रुपये दर मिळत होता. त्यात तब्बल १८०० रुपये प्रतिक्विंटलची घसरण झाली आहे.

लासलगाव येथे कांद्याला सरासरी ३५०० रुपये इतका भाव मिळत आहे. हीच परिस्थिती लाल कांद्याची असून, हा कांदा २४०० रुपये प्रतिक्विंटलवर आला आहे. लाल कांदाही किरकोळ प्रमाणात विक्रीस येत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात कांद्याच्या किमान निर्यातमूल्य दरात 800 डॉलर प्रतिटन वाढ केल्याने निर्यात जवळपास ठप्प झाली आहे, तर नाफेडने साठवणूक केलेला दोन लाख टन कांदा किरकोळ बाजारात 25 रुपये प्रतिकिलो दराने विक्री सुरू झाल्याने त्याचा परिणाम कांद्याच्या दरावर झाल्याचे दिसून येत आहे.

कांदादरात घसरण कायम

लासलगाव बाजार समितीचे एकूण कांदा लिलाव १०४२ वाहनांतून १२८१६ क्विंटल आवक होऊन लाल कांद्याला कमीत कमी 2000, जास्तीत जास्त 3501, सरासरी 2401 रुपये, तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी 1852, जास्तीत जास्त 4001, सरासरी 3500 भाव मिळाला.

हेही वाचा :

The post लासलगाव बाजार समिती आजपासून १२ दिवस बंद appeared first on पुढारी.