लेखी आदेशाशिवाय शिवजयंती मिरवणुकीस परवानी नाही – सहाय्यक पोलिस आयुक्त

जुने नाशिक : लेखी आदेश असल्याशिवाय शिवजयंती मिरवणुकीस परवानगी देणे योग्य राहणार नाही. कोरोना प्रादुर्भाव संदर्भातील सरकारच्या सूचनांचे पालन करत प्रतिमापूजनास परवानगी असेल, अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना यांनी दिली. 

शिवजयंतीनिमित्त सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची भद्रकाली पोलिस ठाण्यात बैठक झाली. त्या वेळी त्या बोलत होत्या. मिरवणूक काढण्यासंदर्भात सरकारकडून परवानगी असल्याचे लेखी आदेश प्राप्त झाल्यास मंडळांना परवानगी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानिमित्ताने आवश्‍यक ती सर्व पूर्वतयारी करून ठेवण्यात येईल. महापालिकेची परवानगी, मिरवणूक मार्गाची स्वच्छता किंवा अन्य कुठली कामे असतील, तर ती महापालिका अधिकाऱ्यांना सांगून पूर्ण करून ठेवण्यात येतील. बैठकीस महापालिका अधिकारी हजर असून, त्यांना काही सूचना करायच्या असतील, तर मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना त्या सांगाव्यात, असे सांगण्यात आले. भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे, सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत सोमवंशी, निरीक्षक दत्ता पवार, महापालिका अधिकारी राजाराम कातकाडे, राजू गायकवाड, सुनील शिरसाट, राजू वाघ, तसेच मंडळाचे पदाधिकारी चेतन शेलार, गणेश बर्वे, सागर देशमुख, रोहित चव्हाण, हर्षद इंगळे, हरी आंबेकर आदी उपस्थित होते. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा हिरमोड 

शुक्रवारी (ता. १९) शिवजयंती साजरी होणार आहे. शिवजयंती उत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळांनी मिरवणुकीची तयार करण्यास सुरवात केली होती. काही मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अशात पोलिसांनी बैठकीत केलेल्या सूचनांमुळे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा हिरमोड झाला. त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे. काहींनी तर शासनस्तरावर परवानगी मिळविण्यास धावाधाव सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल