लॉकडाउनकाळात पिके घ्यायची की नाही? शेतकऱ्यांचा सवाल; बाजार बंदमुळे कोट्यवधींचे नुकसान 

रेडगाव खुर्द (जि. नाशिक) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दररोज होणाऱ्या लॉकडाउनच्या चर्चा आणि कोरोनामुळे बंद झालेले सर्व आठवडेबाजार यामुळे सर्वाधिक नुकसान शेती आणि पिकांचे झाले आहे. कोरोनाकाळात शेतकऱ्यांनी शेतात पिके घ्यायची की नाही, याबाबत शासनाने स्पष्ट धोरण जाहीर करावे, अशा चर्चा जोर धरू लागल्या आहेत. 

मागील वर्षीचा लॉकडाउनचा अनुभव वाईट असतानाही वर्षपूर्तीनंतर वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता प्रशासनाचे अपयश आणि लोकप्रतिनिधींची कर्तव्यशून्यता झाकण्यासाठी लॉकडाउनचे हत्यार बाहेर काढले जात आहे. रात्रीतून पिकांचे भाव मातीमोल होतात. त्यामुळे एक तर तो शेतमाल मातीमोल विकावा लागतो किंवा फेकून द्यावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी होत आहे. उद्योग, व्यापार बंद पडले तर त्यांचे कोणतेही नुकसान होत नाही. उत्पादन नाही त्यामुळे खर्चही नाही. मात्र शेतकरी पीक येण्याच्या अगोदर बेभरवशावर मातीत कर्ज काढून वेळप्रसंगी घरातील दागदागिने विकून पैसे ओततो. पुढे काय होईल हे त्याला माहीत नसते. त्यात अशा परिस्थितीत लॉकडाउनचे नुसते शब्द जरी कानी पडले तरी व्यापारी भाव पाडतात किंवा पडतात. या गोष्टींचा लोकप्रतिनिधींसह अधिकारी कोणताही विचार करीत नाहीत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. यापुढे शासनाने शेतकऱ्यांना स्पष्ट सांगावे की अमुक शेतमाल अमुक काळात पिकवा किंवा नका पिकवू किंवा लॉकडाउनच करायचे असेल तर अगोदर भरपाई द्यावी. कोरोनामुळे मार्केट बंद आठवडेबाजार बंद मग शेतकऱ्यांनी घाम आणि पिकविलेला शेतमाल विकायचा कोठे? यामुळे कोरोनाने सर्वाधिक हानी पोचविली असेल तर ती शेतीपिकांना. याउलट लॉकडाउनमुळे इतर सर्व उत्पादित वस्तू आणि सेवांचे दर मोठ्या प्रमाणात वाढविली गेली. परंतु शेतमालाला कोणी ग्राहक नाही म्हणून स्थानिक बाजारात दर पाडले जातात. भीतीपोटी अनेक मोठे व्यापारीही सहभागी होत नाहीत. 

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी

आवक ३० टक्क्यांवर 

लासलगाव बाजार समितीत सर्वसाधारण भाजीपाला आणणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सव्वाशे ते दीडशे असते. आता ५० ते ६० शेतकरी येतात. सर्वसाधारण भाजी जुड्या दोन ते तीन हजार रुपये असतात. आता चारशे ते पाचशे येतात. आवक अत्यंत कमी होऊनही फक्त लॉकडाउनच्या भीतीमुळे शेतमालाला उठाव नाही. चांदवड बाजार समितीतही आवक ३० टक्क्यांवर येऊनही भाजीपाल्याला भाव नाही. 

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता