नाशिक : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. सार्वजनिक ठिकाणांवर वावरताना निर्बंध आणले असून, गरज पडल्यास लॉकडाउन करण्याचा इशारा दिल्याने त्याचा परिणाम परराज्यातील कामगारांच्या मानसिकतेवर झाला आहे. लॉकडाउन जाहीर झाल्यास गावाकडे जाता येणार नसल्याच्या भितीने अनेक कामगार परतण्याच्या तयारीत आहेत.
मार्च २०२० मध्ये देशात लॉकडाउन झाले होते. रेल्वे, बससेवा तसेच खासगी सेवा बंद करण्यात आल्याने हजारो कामगार नाशिक सोडून गावाकडे परतले होते. कोणी पायी, तर कोणी मिळेल त्या साधनाने गावाचा रस्ता गाठत होते. त्याचा परिणाम औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांवर झाला. लॉकडाउन शिथिल होत असताना कामगार मिळत नसल्याने कंपन्यांची चाके हलली नाहीत. बांधकामे बंद पडल्याने करोडो रुपयांचे नुकसान झाले होते. जानेवारी महिन्यात कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येईल असे वाटत असताना, फेब्रुवारी महिन्यात कोरोना वाढीस लागल्याने पुन्हा लॉकडाउनचा इशारा सरकारने दिला आहे. त्यामुळे लॉकडाउन होईलच. लॉकडाऊन झाल्यास अडकून पडण्याची भिती निर्माण झाल्याने छोट्या कंपन्यांमध्ये कामगार कमी होण्यास सुरवात झाल्याचे समोर येत आहे.
हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ
लेबर कॉन्ट्रॅक्टरची चालबाजी
कोरोना संसर्गामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन होईल की नाही, याबाबत अद्याप साशंकता आहे. सरकारी पातळीवरून अद्याप स्पष्टता नाही. लॉकडाउन सरकारला व सर्वसामान्य नागरिकांनाही परवडणारे नाही. मात्र, असे असतानाही लॉकडाउन होईल, या चर्चेमागे लेबर कॉन्ट्रॅक्टर असल्याचे समोर येत आहे. या माध्यमातून लेबर रेट वाढविणे, कॉन्ट्रॅक्टची मुदत वाढविणे, दोन कॉन्ट्रॅक्टरमधील वादातून आपली माणसे कंपन्यांमध्ये घुसविण्याचे उद्योग समोर येत असल्याचे एका कारखानदाराने सांगितले.
हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले