लॉकडाउनच्या धास्ती, किराण दुकानांवर गर्दी! मालाचा साठा करण्याकडे कल

 

किराणा मालाचा साठा करण्याकडे कल, जीवनावश्‍यक साधनसामग्री तुटवड्याची शक्यता 

नाशिक : 2 एप्रिलपासून नाशिक शहरात सोमवार ते शुक्रवार अंशत: लॉकडाउन, तर शनिवार व रविवार असे दोन दिवस संपूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. परंतु वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर महिनाभर संपूर्ण लॉकडाउन होणार असल्याची चर्चा सुरू आहे. शासनाकडून येत्या एक-दोन दिवसांत लॉकडाउन जाहीर होईल, या चर्चेने किमान महिनाभराचा किराणा मालाचा साठा भरून ठेवण्यासाठी दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा भासण्याची दाट शक्यता

रविवार कारंजा भागात होलसेल दुकानांची मोठी बाजारपेठ आहे. सोमवारी दुकाने सुरू झाल्यानंतर मोठी गर्दी झाली. सायंकाळपर्यंत गर्दी कायम होती. एक-दोन दिवसांत राज्यात पूर्णतः लॉकडाऊन जाहीर होण्याच्या शक्यतेने घरात पुरेसा अन्न, धान्य, मसाले आदींचा साठा करून घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला असून, किराणा मालाची बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा परिसरात मोठ्या प्रमाणात होलसेल दुकानांवर गर्दी दिसून येत आहे. सर्वसामान्य नागरिकांसह किराणा दुकानदारांकडूनही माल भरून ठेवला जात असल्याने महिना- दोन महिन्यांच्या तजबीजीमुळे येत्या काळात जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा भासण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

व्हाॅट्सॲपवर यादी, तुटवड्याची शक्यता 
किराणा माल भरण्यासाठी गर्दी होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर व्हाॅट्सॲपद्वारे यादी मागवून घरपोच किराणा पोचविण्याची सोय दुकानदारांकडून करण्यात आल्याने सोशल डिस्टन्सचे पालन होण्यास मदत झाली. दरम्यान, किराणा मालाला वाढती मागणी लक्षात घेऊन व स्टॉक करून ठेवला जात असल्याने तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू