लॉकडाउनच्या भीतीने शेतकरी भयभीत; कच्ची-पक्की फळे बाजारात, कवडीमोलाने विक्री 

दाभाडी (जि.नाशिक) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लॉकडाउनच्या संभाव्य भीतीने शेतकऱ्यांची गाळण उडाली आहे. मोठ्या कष्टाने फुलविलेली फळबाग व पालेभाज्यांची कच्च्या-पक्क्या अवस्थेतील उत्पादने जिल्ह्यातील विविध बाजारपेठांत दाखल होत आहेत. अगदी कवडीमोलने ही उत्पादने विक्री होत आहेत. शेतकऱ्यांच्या संकट मालिकेत लॉकडाउनने नव्या संकटाची भर पडली असून, अस्मानी आणि सुलतानी संकट उत्पादकांना डोकेदुखी ठरत आहे. 

कवडीमोलाने विक्री; संकटांच्या मालिकेने शेतकरी भयभीत 
पालेभाज्यांना लग्नसराईमुळे आणि उन्हामुळे रसदार फळांची मागणी लक्षात घेऊन पालेभाज्या व फळपिकांची लागवड करण्यात येते. कोरोनाने पुन्हा उसळी घेतल्याने उत्पादकांचे धाबे दणाणले आहे. मेथी, मिरची, कोथिंबीर, शेवगा यासह विविध भाजीपाला उत्पादनांचे भाव कोसळले. लॉकडाउनच्या भीतीने कच्च्या-पक्क्या अवस्थेतील उत्पादनांना बाजाराची वाट दाखविली जात आहे. मिळेल तो भाव पदरात पाडून घेण्याचे मनसुबे व्यक्त होत आहेत. लॉकडाउनच्या भीतीपोटी जिल्ह्याभरात लहान-मोठ्या रस्त्यांच्या कडेला आणि गावागावातील वर्दळीच्या जागी फळांची व भाज्यांची विक्री होत आहे. अल्पदरात उत्पादने मिळत असल्याने ग्राहक जास्तीच्या खरेदीसाठी सरसावल्याचे चित्र आहे. टरबूज, खरबूज, काकडी, द्राक्ष, चिंच, आवळा यांची अल्पदरात विक्री होत आहे. 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

कांदा व फळबाग उत्पादकांची परवड 
कांद्याच्या उत्पादकांना बोगस बियाण्याने फसविले आहे. लावला भगवा अन् उगवला लाल कांदा अशी विचित्र फसवणूक उत्पादक अनुभवत आहेत. या फसवणुकीत अपेक्षित एकरी उत्पादन घटले आहे. भगव्या कांद्याच्या मागणीचा फायदा उठविण्यात अपयश आले आहे. कांद्याचे भाव कोसळण्याचे हे प्रमुख कारण मानले जात आहे. संभाव्य लॉकडाउन लक्षात घेता मिळेल त्या भावात कांदा बाजारात विक्री होत आहे. डाळिंब उत्पादक व व्यापारी वर्गाला परप्रांतीय व आंतरराष्ट्रीय अनियमित वाहतूक व्यवस्था व अचानकच्या सीमाबंदीमुळे कोट्यवधींचे उत्पादन रस्त्यावर सडल्याने जबर फटका बसला आहे. या नुकसानाची भरपाईची करणार कोण, हा गंभीर प्रश्न व्यापारी आणि उत्पादकांना सतावत आहे. कर्जबाजारीपणा वाढविणारे हे संकट शेतीची वाट अधिक बिकट करत आहे. 

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ  

अचानक आंतरराज्यीय सीमाबंदीमुळे खरेदी केलेला तब्बल ४० टन डाळिंब माल ट्रकमध्ये पडून राहिला आणि सडला. धरसोड धोरणाचा फटका बसला आहे. -सतीश भामरे, फळबाग विक्रेता, दाभाडी 

लॉकडाउनसंदर्भात जनमानसात पसरलेला भ्रम दूर करण्याची नितांत गरज आहे. भीतीपोटी उत्पादक दिशाहीन झाले आहेत. बळीराजाला कवडीमोलाने विक्री करावी लागत आहे. 
-बाळासाहेब बागूल, संचालक, राज्य डाळिंब संघ