लॉकडाउननंतर शेती सोडून सर्वच क्षेत्रांत महागाई! दुय्यम वागणूकीची शेतकऱ्यांची खंत 

वडनेरभैरव (जि.नाशिक) : लॉकडाउन काळात देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली असताना देशाला सावरणाऱ्या बळीराजाला दुय्यम वागणूक दिली जात आहे. तीन महिन्यांपासून सर्वच भाजीपाला व फळे कवडीमोल भावाने विकला जात आहे. नाशिकमधील शेती दोन दशकात खर्चिक झाली आहे की ती करून ठेवली आहे, हा संशोधनाचा विषय आहे. यावर आधारित बाजारपेठ कोट्यवधीची उलाढाल करत आहे. पण शेतकरी दिवसेंदिवस बॅकफूटवर जात आहे.

शेतकरी दिवसेंदिवस बॅकफूटवर

मागील लॉकडाउननंतर शेती सोडून सर्वच क्षेत्रांतील लोकांनी मालाचा भाव २५ ते ५० टक्के वाढविला आहे. दुचाकी वाहनाच्या २० ते ५० हजारांनी, तर चारचाकीच्या एक ते तीन लाखांनी किमती वाढल्या आहेत. कोरोनाच्या आधी ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये मंदी होती. हीच परिस्थिती सिमेंट, लोखंड, शेती, औजारे, खते, बियाणे, कीटकनाशके व इंधनाच्या बाबतीत आहे. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

शेतकऱ्यांना दाखवलेले मृगजळ

शेतकऱ्यांना दाखवलेले मृगजळ म्हणजे द्राक्षाला औषध मारा, ब्लोअर घ्या, ती व्हरायटी लावा, विशिष्ट ड्रीप वापरा या सर्व तंत्रज्ञानावर जितका खर्च होत आहे त्याच्या एक टक्काही खर्च कोणी हक्काच्या बाजारपेठेसाठी बाजारभाव मिळावा म्हणून करत नाही. हीच परिस्थिती कांदा व इतर भाजीपाला पिकांची आहे. कोणीही द्राक्ष, कांदा किंवा भाजीपाला यांचे भाव पडले म्हणून रास्ता रोको किंवा रेल्वे रोको केला नाही. याबाबत शेतकरीच गंभीर नसेल तर व्यवस्था कशी बदलणार; साधे निर्यातीचे अनुदान चालू करण्यासाठी कोणी आंदोलन केले नाही, अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना

माल कवडीमोल दराने दलालांच्या घशात घालायचा?

भाव जे कमी झाले ते वाढलेच नाही. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी शेतीत जगातील सर्वात्तम तंत्रज्ञानाचा वापर करतो. ज्याने उत्पादन खर्च अधिक आहे. त्याप्रमाणे बाजारपेठ किंवा बाजारभाव उपलब्ध नसेल तर महाग तंत्रज्ञानाचा वापर करून तयार होणारा शेतमाल किती दिवस कवडीमोल दराने दलालांच्या घशात घालायचा, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. 

महागाई सर्व क्षेत्रांत वाढत असताना शेतीमालाचे भाव मात्र अत्यंत कमी व न परवडणारे आहे. कधी कधी शेतकऱ्याला बाजारपेठेमध्ये स्वतःलाच मालाबरोबर विकून यावे लागते, ही खंत आहे. त्या मुळे उत्पादन खर्च आणि प्रत्यक्षात विक्री, यात मोठी तफावत आहे. हमीभावशिवाय शेतकरी जगूच शकत नाही. इतर उत्पादक त्यांच्या मालाची किंमत ठरवितात; मात्र शेती त्यास अपवाद आहे. -बापूसाहेब पाचोरकर, वडनेरभैरव