लॉकडाउननंतर सर्वच क्षेत्रांत महागाई, शेतमाल मात्र मातीमोल; शेतकऱ्यांची खंत 

वडनेरभैरव (जि. नाशिक) : मागील लॉकडाउननंतर शेती सोडून सर्वच क्षेत्रांतील लोकांनी मालाचा भाव २५ ते ५० टक्के वाढविला आहे. दुचाकी वाहनाच्या २० ते ५० हजारांनी, तर चारचाकीच्या एक ते तीन लाखांनी किमती वाढल्या आहेत. कोरोनाच्या आधी ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये मंदी होती. हीच परिस्थिती सिमेंट, लोखंड, शेती, औजारे, खते, बियाणे, कीटकनाशके व इंधनाच्या बाबतीत आहे. 

लॉकडाउन काळात देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली असताना देशाला सावरणाऱ्या बळीराजाला दुय्यम वागणूक दिली जात आहे. तीन महिन्यांपासून सर्वच भाजीपाला व फळे कवडीमोल भावाने विकला जात आहे. नाशिकमधील शेती दोन दशकात खर्चिक झाली आहे की ती करून ठेवली आहे, हा संशोधनाचा विषय आहे. यावर आधारित बाजारपेठ कोट्यवधीची उलाढाल करत आहे. पण शेतकरी दिवसेंदिवस बॅकफूटवर जात आहे. शेतकऱ्यांना दाखवलेले मृगजळ म्हणजे द्राक्षाला औषध मारा, ब्लोअर घ्या, ती व्हरायटी लावा, विशिष्ट ड्रीप वापरा या सर्व तंत्रज्ञानावर जितका खर्च होत आहे त्याच्या एक टक्काही खर्च कोणी हक्काच्या बाजारपेठेसाठी बाजारभाव मिळावा म्हणून करत नाही. हीच परिस्थिती कांदा व इतर भाजीपाला पिकांची आहे. 
कोणीही द्राक्ष, कांदा किंवा भाजीपाला यांचे भाव पडले म्हणून रास्ता रोको किंवा रेल्वे रोको केला नाही. याबाबत शेतकरीच गंभीर नसेल तर व्यवस्था कशी बदलणार; साधे निर्यातीचे अनुदान चालू करण्यासाठी कोणी आंदोलन केले नाही, अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. भाव जे कमी झाले ते वाढलेच नाही. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी शेतीत जगातील सर्वात्तम तंत्रज्ञानाचा वापर करतो. ज्याने उत्पादन खर्च अधिक आहे. त्याप्रमाणे बाजारपेठ किंवा बाजारभाव उपलब्ध नसेल तर महाग तंत्रज्ञानाचा वापर करून तयार होणारा शेतमाल किती दिवस कवडीमोल दराने दलालांच्या घशात घालायचा, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. 

 हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर 

महागाई सर्व क्षेत्रांत वाढत असताना शेतीमालाचे भाव मात्र अत्यंत कमी व न परवडणारे आहे. कधी कधी शेतकऱ्याला बाजारपेठेमध्ये स्वतःलाच मालाबरोबर विकून यावे लागते, ही खंत आहे. त्या मुळे उत्पादन खर्च आणि प्रत्यक्षात विक्री, यात मोठी तफावत आहे. हमीभावशिवाय शेतकरी जगूच शकत नाही. इतर उत्पादक त्यांच्या मालाची किंमत ठरवितात; मात्र शेती त्यास अपवाद आहे. 
-बापूसाहेब पाचोरकर, वडनेरभैरव 

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू