लॉकडाउनमध्ये द्राक्षाची गोडी कायम! देशांतर्गत बाजारात ३५ ते ५४ रुपये किलोचा दर 

कसबे सुकेणे (जि. नाशिक) : वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र शासनाने ३० एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात लाॕकडाउन जाहीर केला आहे. या काळातही शेतीसह अत्यावश्यक सेवा व वाहतूक सुरळीत सुरू राहणार असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. लॉकडाउननंतरही द्राक्षाची गोडी कायम राहणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

पंधरा दिवसांपूर्वी अल्प दराने शेतकऱ्यांना द्राक्ष विकण्याची वेळ आली. मात्र, आता द्राक्ष हंगामाचा शेवट जसजसा जवळ येऊ लागला आहे तशी द्राक्षांची मागणी वाढत आहे. द्राक्ष हंगामात केवळ १० टक्क्यांपेक्षाही कमी द्राक्षे शिल्लक असल्याने त्या द्राक्षांना चांगला भाव मिळत आहे. देशांतर्गत बाजारपेठेसाठी सरासरी ३५ ते ४५ व निर्यातक्षम द्राक्षाची ५० ते ६० रुपये दराने विक्री होत आहे. त्यामुळे अगोदरच्या द्राक्षबागांची नुकसानभरपाई शेवटच्या द्राक्षबागांमध्ये निघेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. अर्थात, ज्या द्राक्षबागा आता सुरू आहेत त्या मागील वर्षी लॉकडाउनच्या काळात कवडीमोल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. या वर्षीदेखील शेतीसाठीही लॉकडाउन जाहीर झाला असता तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्‍यांची डोकेदुखी वाढली असती. मात्र, महाराष्ट्र शासनाने शेतीहिताचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू  

 

द्राक्ष हंगामाचा शेवट गोड होणार असून, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे. मात्र, मागील काही काळाचा विचार करता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरून काढणे तरीही शक्य होणार नाही. 
-प्रकाश मोगल, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक, मौजे सुकेणे 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात