लॉकडाउनमुळे ग्रामीण भागात ‘कुमारी मातां’चा प्रश्न; शहरात कौटुंबिक वादाच्या घटनांत वाढ

नाशिक : कोरोना विषाणू संसर्गामुळे वर्षभरात लॉकडाउनमुळे रस्त्यावरील गुन्हेगारी, अपघात घटले पण शहरी भागात कौटुंबिक वादाच्या घटना वाढल्या, तर ग्रामीण भागात लॉकडाउनमुळे विवाह करता न आल्याने शंभराहून अधिक महिलांच्या कपाळी ‘कुमारी माता’ म्हणून शिक्का नशिबी आला आहे. बंद आधार केंद्रांमुळे अनेक बाळांच्या पित्यावर तर चक्क अल्पवयीन पत्नीशी संबंध ठेवल्यावरून आरोपी ठरण्याची वेळ आली आहे. गावोगावच्या लॉकडाउनमुळे अनेक महिला कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी पोलिस ठाण्यापर्यंतही येऊ शकल्या नाहीत. 
गेल्या वर्षी शासकीय-प्रशासकीय यंत्रणा प्रथमच कोरोनासारख्या देशव्यापी महामारीला तोंड देत होती. मुंबईतील शेकडो परप्रांतीय पायीच नाशिकमार्गे त्यांच्या राज्यात परतत होते. दुसरीकडे प्रत्येक गाव, खेड्यातील नागरिक ‘बंद’, ‘लॉकडाउन’ हे शब्द अनुभवत होते. लग्न, दशक्रिया विधीसह सगळ्याच सार्वजनिक कार्यक्रमांना प्रतिबंध असल्याने लॉन्स मंगल कार्यालयांना टाळे लागले होते.

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

शेकडो दांपत्यांना विवाहाविनाच राहण्याची वेळ

सहाजिकच गेल्या वर्षीचा सगळा लग्नसराईचा हंगाम हा लॉकडाउन काळात गेला. अशा स्थितीत विवाह ठरलेल्या व साखरपुडा झालेल्या शेकडो दांपत्यांना विवाहाविनाच राहण्याची वेळ आली. मात्र यातून काही मंडळींनी मार्ग काढला. नुसते साखरपुडे उरकून त्र्यंबकेश्वर, पालघर, पेठ, सुरगाणा भागातील अनेक कुटुंबांतील तरुणी सासरी राहायला गेल्या. विवाहांना परवानग्याच नसल्याने केवळ साखरपुडा करून समाजप्रथेप्रमाणे ही कुटुंबे राहत आहेत. 

सामाजिक प्रश्नांची भयावहता 
कायद्याने लीव्ह इन रिलेशनमध्ये राहायला मान्यता असल्याने लॉकडाउन काळात तात्कालिक सोय म्हणून केवळ साखरपुडा करून सासरी नांदायला गेलेल्या कुटुंबातील गैर काहीच नाही. अनेक आदिवासी समाजांत तर साखरपुडा करून एकत्र राहण्याची आणि जमेल तेव्हा विवाह करण्‍याची प्रथा आहे. पण कागदावर चालणाऱ्या सरकारी यंत्रणेत त्यासाठी मात्र कुठलीही सोय नाही. गेल्या वर्षी विवाह केलेल्या कुटुंबांना आज जेव्हा मूल झाले आहे तेव्हा मात्र सिव्हिलसह सरकार दप्तरी नोंदी घेताना संबंधित महिलांच्या प्रसूतीनंतर कुमारी माता अशाच नोंदी घेतल्या जात आहेत. महिलेच्या प्रसूतीनंतर एमएलसी नोंदी घेताना बाळाच्या पित्याच्या नावासोबत मातेच्या वयाचा पुरावा मागितला जातो. त्यासाठी आधारकार्ड ग्राह्य धरले जाते. ग्रामीण आदिवासी भागात लॉकडाउन काळात आधार केंद्रेही बंदच होती. त्यामुळे चुकीच्या जन्मतारखा आणि जन्मतारखाच नसलेल्या आधारकार्डामुळे प्रसूती झालेल्या माता अल्पवयीन माता ठरत आहेत. 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

शंभरावर बाळांचा प्रश्न 
अठरा वर्षांच्या आतील मुलीशी संमतीने अथवा बिगरसंमतीने संबंध ठेवणे हाच मुळात गुन्हा आहे. सहाजिकच जेव्हा एखाद्या मुलीवर अल्पवयीन माता असा शिक्का बसतो तेव्हा रुग्णालयातील नोंद (एमएलसी)नंतर अशा कुमारी मातेच्या बाळाचा पिता कोण, याचा शोध घेण्‍याची जबाबदारी पोलिसांवर येते आणि रिवाजानुसार आणि कोरोना लॉकडाउनमुळे केवळ साखरपुडा करून मूल जन्माला घातलेल्या पित्यावर चक्क आरोपी ठरण्याची वेळ येते आहे. अपवाद म्हणून असे प्रकरण समजू शकतो पण एकट्या नाशिक जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयातील एमएलसी नोंदीनुसार गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमुळे या तीन महिन्यांतच शंभरहून अधिक बाळांचा मोठा प्रश्न एकट्या नाशिक जिल्ह्यात पुढे आला आहे. 

शहरात कौटुंबिक वाद 
कोरोना लॉकडाउन काळात खून, दरोडे, रस्ते अपघातासह भाग एक ते पाचच्या गुन्ह्यात लक्षणीय घट झाली. पण त्याच वेळी कौटुंबिक 
हिंसाचाराच्या घटना वाढल्या, पण त्या रेकॉर्डवर आल्या नाहीत. शहरी भागात महिलांना पोलिस ठाण्यापर्यंत तक्रारीसाठी येता तरी आले. पण ग्रामीण भागात गावोगाव लॉकडाउन काळात महिला पोलिस ठाण्यापर्यंतही पोचू शकल्या नाहीत. त्यामुळे पोलिस दप्तरी ग्रामीण भागात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांची संख्या मोठी नाहीच. महिला तालुक्याच्या आणि मोठ्या गावातील पोलिस ठाण्यापर्यंतच येऊ शकल्या नाहीत. परिणामी कौटुंबिक अत्याचार वाढूनही ग्रामीण भागातील कौटुंबिक अत्याचाराचा आलेख मात्र फार वाढलेला नाही. 

तक्रारीसाठी पोलिस ठाण्यात जाणे अवघड 
शहरात मात्र मे महिन्यापासून कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढल्या. सर्वाधिक ४३ गुन्हे विनयभंगाचे, ३४ अपहरण, ३३ आत्महत्या व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे, विवाहितांच्या छळाचे ३२, तर मारहाणीचे २४, तसेच बलात्कार १७ गुन्हे असून, त्यात आठ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. विनयभंगाच्या उद्देशाचे ३६ गुन्हे दाखल आहेत, तर दोन महिलांचा खून झाला आहे. 

शहरातील गुन्हे 
एप्रिल २१ 
मे ५९ 
जून ६२ 
जुलै ७९ 
विनयभंग ४३ 
अपहरण ३४ 
विवाहितांचा छळ ३२ 
बलात्कार १७ 
विनयभंगाचा उद्देश ३६ 
आत्महत्येला प्रवृत्त करणे ३३