लॉकडाउनला हा ठरु शकतो पर्याय? दिंडोरीच्या अवलियाने सुचविला संपूर्ण लॉकडाउनवर उपाय 

नाशिक : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाउन टाळता यावे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपाय सुचवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत दिंडोरी (जि. नाशिक) तालुक्‍यातील अमोल देशमुख यांनी संपूर्ण लॉकडाउन टाळण्यासाठी उपाय सुचवला आहे.

लॉकडाउन टाळण्यासाठी उपाय?

प्रत्‍येक कुटुंबासाठी क्‍यूआर कोड तयार करत, याद्वारे गर्दीवर नियंत्रण करणे शक्‍य असल्‍याचा दावा त्‍यांनी केला आहे. सोबत अंमलबजावणीत येणाऱ्या मर्यादांचा उल्‍लेखही त्‍यांनी केला आहे. देशमुख यांनी मांडलेल्‍या संकल्‍पनेनुसार क्‍यूआर कोड बनवायचा आहे. लॉकडाउनमुळे अर्थकारणाला खीळ बसत असून, हे टाळण्यासाठी शासनाने आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था, पोलिस, स्‍वयंसेवी संस्‍था (एनजीओ) यांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला एक क्यूआर कोड तयार करायचा. घराबाहेर पडणारी व्‍यक्‍ती सोबत कोड बाळगेल. यामुळे एका वेळी एकापेक्षा अधिक व्‍यक्‍ती घराबाहेर पडणार नाहीत. घराबाहेर पडणारी व्‍यक्‍ती १८ ते ५५ वयोगटातील असावी, गंभीर आजार नसावेत, याची पडताळणी करून घ्यावी.

कुटुंबांसाठी क्‍यूआर कोड, स्कॅनिंगद्वारे गर्दीवर नियंत्रण 

क्यूआर कोड प्रशासनाने मोबाईल ॲपच्या माध्यमातून स्कॅन करून कठोर अंमलबजावणी करावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करताना वेगवेगळ्या ओळखपत्रांची गरज पडणार नाही. नोकरदार, कर्मचारी, दुकानदार, फेरीवाले या सर्वांनादेखील क्यूआर कोड असल्यामुळे ओळखणे सोपे होईल. त्याबरोबरच अनावश्यक गर्दी टाळू शकते. क्यूआर कोड कुठे, किती वेळा स्कॅन झाला यानुसार त्या व्यक्तीवर वेळेचे बंधन आणता येईल. यामुळे लॉकडाउनसदृश परिस्थितीही निर्माण होईल, गर्दीवर नियंत्रण येईल, लोकांचे दैनंदिन कामकाज सुरू राहील, राज्याचे-समाजाचे अर्थकारणही सुरू राहील. सत्तर टक्क्‍यांपर्यंत वर्दळ कमी होऊ शकत असल्‍याचा दावा त्‍यांनी केला आहे. 

अशा आहेत काही अडचणी 
क्यूआर कोड ॲप बनविण्यासाठी लागणारी टेक्निकल टीम, योजना कार्यान्वित करायला लागणारा वेळ यांसह काही आव्‍हाने किंवा अडचणीदेखील त्‍यांनी सूचनेत नमूद केल्‍या आहेत. क्यूआर कोड जनरेट करणारा कर्मचारी वर्ग प्रशिक्षण व लागणारा वेळ, काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक, एका कुटुंबात एकापेक्षा जास्त लोक कमावणारे असतील, तर त्यांना क्यूआर कोड द्यावे लागतील, असा उल्‍लेख त्‍यांनी केला आहे. या अडचणींवर मात करून काळानुरूप बदल करत दीर्घकाळ, लोकांना कमी त्रास होईल आणि कोरोनावर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असा त्‍यांचा दावा आहे.