लॉकडाउन टाळण्यासाठीच गर्दीवर नियंत्रणाचा प्रयत्न – पोलिस आयुक्त दीपक पांडे

नाशिक : कोरोनाची भीती काहीशी कमी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचे योग्य पालन होत नसून, बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व लॉकडाउन टाळण्यासाठी महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलमान्वये बाजारपेठेत येण्यासाठी पाच रुपये आकारले जात आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी दिली. 

पोलिस आयुक्त दीपक पांडे यांची माहिती 

पोलिस आयुक्तालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. पांडे म्हणाले, की कोरानाचा उद्रेक रोखण्यासाठी, बाजारपेठेतील गर्दीवर नियंत्रण यावे, सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजवणी व्हावी व लॉकडाउन करण्याची वेळ नाशिक प्रशासनावर येऊ नये, नागरिकांना त्यांच्या जबाबदारीचे भान लक्षात यावे, नागरिकांच्या काळजीपोटी म्हणून महाराष्ट्र पोलिस अधिनियम असलेल्या अधिकारांचा वापर करत ही दंडाची तरतूद केली आहे. दंड करूनही नागरिक बाजारपेठेत गर्दी करीत असतील, तर लॉकडाउन अटळ आहे. त्यामुळे नागरिकांनी बाजारपेठेत विनाकारण गर्दी न करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

विविध ठिकाणी कारवाई 
शहरातील विविध बाजारपेठेत सामाजिक अंतर न पाळणाऱ्या विविध आस्थापनांवर कारवाई करून एक लाख ८४ हजार ८२५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एकाच दिवसात भद्रकाली, पंचवटी, गंगापूर, सातपूर, अंबड, इंदिरानगर आदी बाजारपेठांमध्ये मिळून एक हजार ७६५ पावत्या देण्यात आल्या, तर आठ हजार ८२५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.  

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण