लॉकडाउन लागला तरी रमजान पर्वात फळ विक्री! मालेगावात हजारो लोकांना रोजगार  

मालेगाव (जि.नाशिक) : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वास बुधवार (ता. १४)पासून सुरवात होणार आहे. लाखो नागरिक रमजानचे महिनाभर उपवास ठेवणार आहेत. यासाठी येथील फळ विक्रेत्यांनी नियोजन केले आहे. खानदेशमधून केळी मागविण्यात येणार आहेत. रमजान पर्वात येथे रोज २० ट्रक केळी विक्रीसाठी येतात. यंदा संपूर्ण रमजान काळात मालेगावत दीड ते दोन हजार टन केळी येणार आहेत. 

रमजान पर्वात दीड हजार टन केळीची विक्री 
मालेगाव मुस्लिमबहुल लोकवस्तीचे शहर आहे. रमजान काळात फळांची विक्री दुपटीने वाढते. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात मालेगावचा पूर्व भाग हॉटस्पॉट ठरला होता. संपूर्ण रमजान पर्व कडक लॉकडाउनमध्येच गेले. त्या वेळीदेखील प्रशासनाने येथे फळे उपलब्ध करून दिली होती. या वर्षी वाढत्या कोरोनामुळे लॉकडाउनची शक्यता असली तरी पूर्वीसारखी कोरोनाची भीती राहिली नाही. शिवाय लॉकडाउन लागला तरी रमजान पर्वात फळ विक्रीला हमखास परवानगी असेल. रमजानच्या उपवास काळात खजूरपाठोपाठ सर्वाधिक मागणी केळीला असते. त्यामुळे येथील घाऊक व्यापाऱ्यांनी खानदेशमधून केळी खरेदी करण्याचे नियोजन केले आहे. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू  

मालेगावात रोज वीस ट्रक केळी दाखल; हजारो लोकांना रोजगार 
शहरात २५ पेक्षा अधिक फळांचे घाऊक व्यापारी आहेत. रमजान काळात सामान्यांना परवडणाऱ्या टरबूज व केळी या फळांची सर्वाधिक विक्री होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी ही फळे खरेदी करण्याची तयारी केली आहे. रावेर, पाचोरा, जळगाव, मुक्ताईनगर आदी भागातून केळी आणण्यात येणार आहेत. येथे रोज दहा ट्रक केळीची विक्री होते. रमजान पर्वात ती दुपटीने होते. साधारणतः २० ट्रक केळी येथे गुरुवारपासून विक्रीसाठी येतील. एका ट्रकमध्ये तीन टन केळी येतात. दिवसाला ६० टन केळीची विक्री होते. संपूर्ण रमजान महिन्यात दीड ते दोन हजार टन केळीची विक्री होऊ शकेल. 
रमजानच्या पार्श्वभूमीवर केळीचे भाव वाढले आहेत. महिन्यापूर्वी ७०० ते ८०० रुपयांवर असलेली केळी १३०० ते १४०० क्विंटलने मिळत आहे. मालेगावात ४० ठिकाणी केळी पिकविण्याची गुदामे आहेत. येथे फक्त केळी विक्रीतून साडेतीन ते चार हजार लोकांना रोजगार मिळतो. 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

कच्च्या केळीचे भाव वाढले आहेत. त्यामुळे ३० रुपये डझनानेच किरकोळ विक्री करावी लागते. गेल्या वर्षीसारखा कडक लॉकडाउन लावायला नको. रमजानमध्ये ग्राहकांकडून केळीला चांगली मागणी असते. -अफरोज बागवान, केळी विक्रेता