लॉकडाऊनच्या धास्तीने पेन्शनर्सची बॅंकांमध्ये गर्दी; प्रशासन, पोलिसांचे दुर्लक्ष

नाशिक : आर्थिक वर्ष संपुष्टात आल्यानंतर बॅंकामध्ये हयातीचा दाखला जमा करण्याबरोबरच पेन्शन काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने सामाजिक अंतर नियमाचे उल्लंघन होत असल्याचे शहराच्या विविध भागांमध्ये दिसून येत आहे. पोलिस, महापालिका व बॅंक प्रशासनाकडूनदेखील गर्दीला आवर घातला जात नसल्याने कोरोना संसर्ग वाढण्यास कारण ठरतं असल्याची बाब समोर आली आहे. 

पेन्शन बंद होण्याची भीती 

शहरात गेल्या महिनाभरापासून शनिवार व रविवार लॉकडाउन करण्यात आला आहे. मार्चअखेरीस बॅंक व्यवहार पूर्ण करण्याचा कालावधी असतो. त्यामुळे चार ते पाच दिवस बॅंकेचे व्यवहार बंद होते. सोमवारी (ता. ५) सर्वच बॅंकांचे व्यवहार सुरळीत झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांनी गर्दी केली. पेन्शन नियमित सुरु राहण्यासाठी हयातीचा दाखला बंधनकारक असतो. त्यामुळे जेष्ठ नागरिकांकडून दाखले जमा करण्यासाठी सोमवारी मोठ्या प्रमाणात बॅंकामध्ये गर्दी करण्यात आली.

हेही वाचा - देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडूनदेखील चिमुरडी सुखरूप

ऑनलाईन बँकिंगकडे पाठ    

केंद्र व राज्य सरकारकडून एक तारखेला पेन्शन जमा होते. एटीएम कार्ड असले तरी जेष्ठ नागरिकांना कार्ड वापराबाबत माहिती नसल्याने रोख रक्कम काढण्यासाठी गर्दी करण्यात आली. अनेक बॅंकांच्या रांगांमध्ये चेहऱ्यावर मास्क नसणे, सोशल डिस्टन्स न राखणे, सॅनिटायझरचा वापर न करणे या शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा - महिलांनो सावधान! तुमच्या फेक अकाऊंटवरून पुरुषांना ब्लॅकमेलिंग; सायबर भामट्यांचा नवा प्रकार

प्रशासनाची बघ्याची भूमिका 

नाशिक रोडच्या दत्तमंदिर भागात महापालिकेच्या शिक्षण समिती सभापती संगीता गायकवाड वास्तव्याला आहे. वास्तव्यास असलेल्या इमारतीतमध्ये दोन राष्ट्रीय कृत बॅंकामध्ये गर्दी उसळल्यानंतर उपनगर पोलिस ठाण्याला त्यांनी कळविले. दोन तासांनी पोलिस आले, परंतु फक्त फेरफटका मारून गेले. महापालिकेचे कर्मचारीदेखील या भागात फिरकले नाही. बॅंक प्रशासनानेदेखील गर्दीची दखल न घेता शटर अर्धवट लावून गर्दी बाहेर थोपविली. गर्दी ओसरल्यानंतर या भागात जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात आली.