लॉकडाऊननंतर पुन्हा शटर डाऊन, तुम्हीच सांगा जगायचे कसे? व्यावसायिकांचे जगणे अवघड 

पंचवटी (नाशिक) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर गतवर्षी शासनाने लॉकडाउन केले. त्यामुळे बँकेतील रोजदांरीवरील उदरनिर्वाहाचे साधन गेले. आता छोटा टेम्पो घेऊन नव्याने उदरनिर्वाह सुरू केला, तर पुन्हा शनिवारी व रविवारी शटरडाउन. मग तुम्हीच सांगा भाऊ, कुटुंबासह जगायचे कसे? असे निरुत्तर करणारे प्रश्‍न ऐकल्यावर खरोखर कोरोनाने सर्वसामान्यांचे जगणे कसे असह्य केले आहे, याची कल्पना येते. 

कडक निर्बंधामुळे रस्त्यावरील व्यावसायिकांचे जगणे बनले अवघड 
कोरोनामुळे अनेक छोटे, तर काही मोठे उद्योगही बंद पडले. त्यानंतर आलेल्या लॉकडाउनने तर सर्वसामान्यांचे जगणे अवघड करून टाकले. सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीमधील अनेक व्हेंडर कंपन्या मागणीअभावी बंद पडल्या, तर छोट्या उद्योगांनीही मागणी नसल्याने व्यवसायालाच कुलूप ठोकले. त्यामुळे अनेकांवर जगण्यासाठी भाजीपाला विक्रीपासून ते डबे पोचविण्याचे काम करण्याची वेळ आली. आयसीआयसीआय बँकेत नोकरी करणाऱ्या नीलेश राऊत या कुंभारवाड्यातील युवकाच्या नोकरीवरही गंडांतर आले. त्यानंतर त्याने मामाच्या मालकीचा टेम्पो घेऊन त्यात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आई-वडिलांसह पाच जणांचे कुटुंब असून, कोरोनामुळे जेमतेम हात व तोंडाची गाठ पडत असल्याने जगणे अवघड बनल्याची प्रतिक्रिया त्याने दिली. कोरोनामुळे अशा हजारो युवकांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. मात्र, अशा परिस्थितीतही जगण्याचा संघर्ष सुरू असल्याचे त्याने सांगितले. 

हेही वाचा - देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडूनदेखील चिमुरडी सुखरूप

गरिबाला जगण्यासाठी संघर्ष हा पाचवीलाच पुजलेला
रोज सकाळी टेम्पोत भाजीपाला टाकला, की विशिष्ट चौकात उभा राहतो. संबंधित ठिकाणी ग्राहक न आल्यावर दुसऱ्या जागी टेम्पो उभा करून व्यवसाय करतो, असे त्याने सांगितले. लॉकडाउनबद्दल आमची काहीही तक्रार नाही. मात्र, शिक्षित असूनही नोकरी नाही, दुसरीकडे व्यवसाय करणेही अवघड बनल्याने जगावे कसे, असा प्रश्‍न पडल्याचे त्याने सांगितले. कोरोना काय अन्य दुसरी कोणती भयंकर महामारी आली, तरी आम्हा गरिबाला जगण्यासाठी संघर्ष हा पाचवीलाच पुजलेला असतो, अशी खंतही त्याने व्यक्त केली. अशीच परिस्थिती हातावर पोट असलेल्या अनेक व्यावसायिकांचीही झाली आहे. सुरवातीच्या काळात अनेक समाजसेवी संस्था व दानशूरांनी मदत केली. मात्र, आता कोणीही पुढे येत नसल्याने जगण्यासाठी संघर्ष सुरू असल्याचे त्याने सांगितले.  

हेही वाचा - महिलांनो सावधान! तुमच्या फेक अकाऊंटवरून पुरुषांना ब्लॅकमेलिंग; सायबर भामट्यांचा नवा प्रकार