लोकसभा निवडणुकीसाठी मनसेकडून चाचपणी

Raj Thackeray

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भाजप, शिवसेना, काँग्रेसपाठोपाठ मनसेनेदेखील आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून नाशिक लोकसभा मतदारसंघात संघटना मजबूत करण्यासह उमेदवारी निश्चितीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरचिटणीस किशोर पाटील यांच्याकडे निरीक्षकपदाची जबाबदारी सोपविली आहे. पाटील हे गुरुवार (दि. २४) पासून दोनदिवसीय नाशिक दौऱ्यावर येत आहेत. ते मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पक्षश्रेष्ठींना अहवाल देणार आहेत.

ओबीसी आरक्षण तसेच प्रभागरचनेच्या घोळामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. लोकसभा निवडणुकांनंतरच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने सुरू केलेल्या तयारीने या चर्चेला पुष्टी मिळत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट, शरद पवार गट आणि शिवसेना शिंदे गटासह उद्धव ठाकरे गटानेही आता लोकसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यापाठोपाठ मनसेनेही आता लोकसभा निवडणुकीसाठी चाचपणी सुरू केली आहे.

पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण दौऱ्यानंतर पक्षाध्यक्ष राज ठाकरेंनी आता राज्यातील महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी लोकसभा मतदारसंघनिहाय निरीक्षक नियुक्त केले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सरचिटणीस किशोर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील हे गुरुवार, शुक्रवार असे दोन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून पदाधिकाऱ्यांसह विभागप्रमुख, शाखाप्रमुखांशी चर्चा करणार आहेत. या दौऱ्यात मनसेच्या संभाव्य उमेदवाराविषयीही चर्चा केली जाणार आहे. यासंदर्भातील अहवाल पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना सादर केला जाणार आहे.

राज ठाकरे सप्टेंबरमध्ये नाशकात

राज ठाकरे हे येत्या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका होणार आहेत. यांमध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुकांसंदर्भात आढावा घेतला जाणार आहे. नाशिक लोकसभेसाठी भाजप, शिंदे गट, महाविकास आघाडीपाठोपाठ मनसेही रिंगणात उतरणार असल्याने नाशिकची लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

The post लोकसभा निवडणुकीसाठी मनसेकडून चाचपणी appeared first on पुढारी.