लोकसभा निवडणूक साहित्यासाठी दर घोषित; उमेदवारांच्या खर्चावर येणार बंधने

election 2024 pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पाेहचली असतानाच निवडणूक आयोगाने विविध साहित्याचे दर घोषित केले आहेत. त्यानूसार एक कप चहासाठी १२ रुपये दर निश्चित करण्यात आला असून मिसळपाव, पावभाजीच्या एका प्लेटकरीता ६५ रूपये दर असतील. त्यामूळे प्रत्यक्ष निवडणूकीवेळी उमेदवारांच्या खर्चावर बंधने येणार आहेत.

निवडणुका म्हटलं की उमेदवारांकडून वारेमाप खर्च केला जातो. मतदारांना पैश्यांचे आमिष दाखविण्यापासून ते कार्यकर्त्यांवर सढळ हाताने पैसे खर्च केले जातात. त्यामुळेच निवडणूकांमध्ये पैशांचा मोठ्या प्रमाणात होणारा वापर बघता निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाची बंधने घालून दिली आहेत. त्यानूसार लोकसभेसाठी उमेदवारी करणाऱ्यांना ९५ लाख रुपयांपर्यंत खर्चाची मर्यादा घालून देण्यात आली आहे. त्यासोबत निवडणूकीत उमेदवारांकडून विविध बाबींवर होणाऱ्या खर्चाला लगाम घालण्यासाठी आयाेगाने दरनिश्चिती केली आहे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा करून हे दर निश्चित करण्यात आले असून मंगळवारी (दि.१२) त्याची घोषित करण्यात आली.

निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या यादीनूसार अर्धा कप चहासाठी ६ तर फुल्लसाठी १२ रुपये दर निश्चित करण्यात आले आहे. तर कॉफीच्या एका कपसाठी १२ रुपये, वडापावसाठी १२ रूपये, भजी, पोहे, कचोरी, फरसाणसाठी साधारणत: १५ ते २० रुपये दर असतील. तर शाकाहारी जेवणा साठी १५० रुपये व नॉनव्हेज थाळीसाठी २५० रूपये दर निश्चित करण्यात आले. पाण्याची बॉटल साठी २० रुपये दर असतील. प्रचारावेळी सभा, बैठका, जाहिर सभा, रॅली अशा सर्व ठिकाणच्या खर्चावर प्रशासनाची करडी नजर असेल. त्यासाठी पथके तैनात केली जाणार असून उमेदवारांना वेळोवेळी प्रशासनाकडे त्यांच्या खर्चाचा तपशील सादर करावा लागेल.

वाहनांसाठी दरनिश्चिती
निवडणूक काळात उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांसाठीच्या वाहनांसाठी दरनिश्चित करण्यात आले आहे. हे दर प्रति किलोमीटरसाठी आहेत. ऑटो रिक्षाला २४० किलोमीटरसाठी ८८० रूपये, १२० किलोमीटरसाठी ४४० रूपये दर असेल. जीप, टेम्पो, टॅक्सी, बोलेरो, टाटा व्हीक्ट्रा, क्वालिस, तवेरा या गाडयांचे प्रतिदिन २४० किलोमीटरसाठी २७५० तर १२० किलोमीटरसाठी १३७५ रूपये दर असेल. या रकमेत इंधन आणि खर्चाचा समावेश आहे.

प्रकाश योजनेवरही निर्बंध
प्रचारावेळी होणाऱ्या जाहिर सभांवेळी वापरण्यात येणाऱ्या १२५ केव्ही जनरेटरसाठी प्रतिदिन १५ हजार रूपये दर निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय लाउडस्पिकर, माईक, अ‍ॅम्पिलीफायर साठी प्रतिदिन ६ हजार रूपये, ट्यूबलाईट ५० रुपये, हॅलोजन ७० रूपये, फॅन १३ रूपये, कुलर २५० रूपये, एलईडी टीव्ही ११९५ रूपये यासह लॅपटॉप, एलईडी व्हॅन, ड्रोन कॅमेरा आदींचेही दर निश्चित करण्यात आले आहेत.

प्रचार साहित्यालाही दरनिश्चित
प्रचारावेळी नेत्यांच्या स्वागतासाठी वापरण्यात येणाऱ्या अडीच फुटांच्या सफारी हारासाठी १३० रूपये तर ७ त ९ फुटांच्या हारासाठी ४५० रूपये दर निश्चित करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त प्रचार साहित्य, फ्लेक्स, स्टेज, स्टीकर तसेच प्रसारमाध्यमांमधील जाहिरातीचे दरही या यादीमध्ये जाहिर करण्यात आले आहे.

The post लोकसभा निवडणूक साहित्यासाठी दर घोषित; उमेदवारांच्या खर्चावर येणार बंधने appeared first on पुढारी.