वडांगळीची सती माता यात्रा स्थगित; दोडी, मऱ्हळ यात्रावर देखील विरजण

सिन्नर (जि.नाशिक) : देशभरातील बंजारा समाज बांधवांचे श्रद्धास्थान व बोकडबळीमुळे प्रसिद्ध असणाऱ्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील सती मातेचा वार्षिक यात्रोत्सव कोरोना पार्श्वभूमीवर यंदा रद्द करण्यात आला आहे .

वार्षिक यात्रोत्सव कोरोना पार्श्वभूमीवर रद्द

माघी पौर्णिमेनिमित्त भरवण्यात येणारा यंदाचा यात्रोत्सव दिनांक 26 ते 28 फेब्रुवारी दरम्यान होणार होता . या पार्श्‍वभूमीवर तहसीलदार राहुल कोताडे यांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत, आरोग्य व पोलीस यंत्रणा तसेच सती माता देवस्थान ट्रस्ट विश्वस्तांच्या उपस्थितीत सोमवारी (ता.16) तहसील कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी सतीमाता देवस्थानचा यंदाचा वार्षिक यात्रोत्सव रद्द करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार कोताडे  यांनी दिली या उत्सवादरम्यान मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांना मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली असून बाहेरून येणाऱ्या भाविकांना मात्र वडांगळी येथे येण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे  तहसीलदारांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार

प्रशासनाच्या वतीने आवाहन
वडांगळी यात्रा मंदीर परिसरात लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित असतात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरातून येणा-या भाविकांनी यात्रेसाठी येण्याचे टाळावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा - "माझी चिमुरडी उपाशी असेल हो.." चिमुकलीचा लागेना थांगपत्ता; मातेचा आक्रोश

दोडी, मऱ्हळ यात्रावर देखील विरजण....
वडांगळी प्रमाणेच दोडी येथील म्हाळोबा महाराजांचा वार्षिक यात्रा उत्सव माघी पौर्णिमेला आयोजित करण्यात येतो. ही यात्रा देखील बोकडबळी साठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश या भागातील धनगर समाज भाविक या उत्सवासाठी हजेरी लावत असतात. त्याशिवाय प्रती जेजुरी मानल्या जाणाऱ्या मऱ्हळ येथील श्री खंडोबा महाराजांचा पाच दिवसीय यात्रोत्सव देखील याच दरम्यान आयोजित करण्यात येत असतो  सिन्नर तालुक्यातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या दोन्ही यात्रावर कोरोना नियमावलीमुळे विरजण पडण्याची शक्यता आहे.