वणी : पुढारी वृत्तसेवा
उन्हाचा चटका वाढू लागताच जंगलातील वन्यप्राणी व पक्षी यांची पाण्यासाठी वणवण वाढली आहे. वानरांच्या टोळ्या, मोर व अन्य प्राणी जंगलालगतच्या शेतात पाण्याच्या शोधात येताना शेतातील मालाची नासडी करत असल्याची बातमी ‘पाण्याच्या शोधात वानर, मोरांकडून पिकाची नासडी‘ होत असल्याच्या वृत्ताची तत्काळ दखल घेत वनविभागाने पायरपाडायेथील जंगलात वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी छोटे तळे तयार करुन त्यात पाणी सोडण्यात आले आहे.
वणीपासून काही अंतरावर जंगलाचा भाग आहे. अहिवंतवाडी, पायरपाडा, चंडिकापूर, भातोडा या गावालगत जंगल आहे. उन्हाची तीव्रता वाढत असून, वन्य पक्षी व प्राणी पिण्याच्या पाण्याच्या शोधासाठी शेतात आणि गावात येऊ लागले आहेत. बिबट्या वन्यप्राणी व पक्षी जंगलालगत असलेल्या शेतात पाण्याच्या शोधात येताना शेतातील कांद्याची तसेच अन्य शेतमालाची नुकसान करत आहेत. जंगलात छोटी छोटी वनतळे बनवणे गरजेचे असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले होते.
अहिवंतवाडी डोंगर ते भातोडा असा डोंगराचा भाग आहे. या ठिकाणी शेकडो मोर इतर वन्यजीव आहेत. या परिसरातील नदी, ओढे, नाले, कोरडे झाले आहे. बिबट्यासारखे हिंस्त्र प्राणीदेखील या ठिकाणी पाणी प्यायला येतात. विहिरीजवळील साचलेल्या डबक्यात बिबट्या पाणी पिताना लोकांना दिसला आहे. बिबट्याचा वावर सुरू झाल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. तरी आम्ही जंगलाच्या बाजूला काही भांड्यात पाणी ठेवतो, असे काही शेतकऱ्यांनी सांगितले. याबाबत वनविभागाने त्वरित पाण्याची उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानुसार वन परिक्षेत्र अधिकारी राहुल वाघ यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती दिली होती. वाघ यांनी तातडीने दखल घेत वनरक्षक कृष्णा एकशिंगे व वन कर्मचाऱ्यांना सूचना करून त्या ठिकाणी छोटेसे बशीच्या आकाराचे खड्डे खोदून पाणी साठवण्यासाठी व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती दिली.
उन्हाची तीव्रता वाढत असून, जंगलात पाण्याचे ओढे -नाले कोरडे झाले आहे. छोटे वनतळे किंवा तत्सम काही व्यवस्था प्राध्यान्यक्रमाने नेमून जंगलातील कोणत्या भागात व्यवस्था होऊ शकते याचा आढावा घेण्यात येवून त्यानुसार पाण्याची तातडीने व्यवस्था करण्यात आली आहे. – राहुल वाघ, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन विकास महामंडळ, दिंडोरी विभाग.
The post वनतळी बांधण्याच्या वनविभागाकडील शेतकऱ्यांच्या मागणीला मंजुरी appeared first on पुढारी.