वनविभागाचे वनवामुक्त अभियान कागदावरच! पश्चिम पट्ट्यातील वनक्षेत्रातील वृक्षसंपदा खाक 

गिरणारे/गंगापूर (जि. नाशिक) : नाशिकच्या वनक्षेत्रात डोंगररांगांसह घाट माथ्यावरील वनसंपदा वाढत्या वनव्याच्या घटनांमुळे धोक्यात आली आहे. एकीकडे पर्यावरण विभाग कोट्यवधी झाडे लावण्यासाठी आवाहन करते. त्यासाठी मोठा शासकीय निधी, कंपन्यांचा सामाजिक फंड वृक्षारोपनासाठी खर्च होतो, मात्र वनक्षेत्रात असलेल्या असुरक्षिततेमुळे, वनविभागाच्या दुर्लक्षाने यंदाही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून जंगलसंपदा व जैवविविधता नष्ट होण्याची घटना वनक्षेत्रात घडली आहे.

नाशिकच्या पश्चिम पट्ट्यातील रोहिले, साप्ते (ता. त्र्यंबकेश्वर) नजीकच्या हजारो हेक्टरवरील वनक्षेत्रात सोमवारी (ता.१) रोजी वणवा लागल्याने हजारो हेक्टरवरील वनसंपदा भक्ष्यस्थानी गेली आहे. तर, दुर्ग रामशेजच्या पूर्व पश्चिम व आजूबाजूच्या डोंगरांवर वणव्यात वनक्षेत्राचे मोठे अपरिमित नुकसान झाले आहे. 

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

नाशिकच्या पश्चिमेकडील साप्ते, रोहिले नजीकच्या हजारो हेक्टर वनक्षेत्रात दरवर्षीप्रमाणे यंदा ही तीन दिवसापूर्वी वणवा लागून येथे ५ फूटाहुन अधिक व लहान अशी हजारोंच्या संख्येने झाडे जळून खाक झाली. तसेच कित्येक जमिनीत दडून बसलेले पक्षी, त्यांची अंडी, नैसर्गिक बीजे यात भक्ष्यस्थानी पडली आहेत. वन्यप्राणी तर येथून गायबच झाली आहेत. तसेच दुर्ग रामशेज (ता. दिंडोरी) येथे पूर्व पश्‍चिम भागात किल्ला चारही बाजूने ८० टक्के चाहुबाजूने जळून गेला असून, येथील नैसर्गिक नुकसान दरवर्षीच होत असते. दुर्ग अंकाई टंकाई (मनमाड) किल्ल्यावर ही यंदा आगी लागल्याने किल्ल्याचा मोठा परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी गेला आहे.

 हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा

वन व्यवस्थापन समित्या कागदावरच

गडकिल्ल्यांच्या परीसरासह, घाट वनक्षेत्रात संरक्षणाचा अभाव आहे. वनविभागाच्या कुठे जंगलक्षेत्रात चौक्या नसून, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष्याने वनक्षेत्र दरवर्षी भक्ष्यस्थानी जात आहे. याबाबत अजूनही गांभीर्य दाखवले जात नसून केवळ वनवामुक्त गाव परिसर असे स्टिकर लावले असल्याचे दिसत आहे. बहुतांशी गावांत वन व्यवस्थापन समित्या कागदावरच आहेत. त्यांना वणवा रोखण्यासाठी, विझवण्यासाठी कुठलेही प्रशिक्षण नसल्याने वणवा सातत्याने लागत असल्याच्या घटना घडत आहे. दरम्यान, गडकिल्ले, डोंगर परिसर वनवामुक्तीसाठी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने प्रादेशिक मुख्य वंनसंरक्षकांना निवेदन दिले.