वन्यजीव सप्ताह : मानव-बिबट्या सहजीवन जागृतीची आवश्यकता

वन्यजीव सप्ताह www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरासह लगतच्या ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांपासून बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यातूनच मानव-बिबट्या संघर्षाला आमंत्रण मिळत आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी मानव-बिबट्या सहजीवन जागृतीची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पूर्व वनविभागाचे सहायक वनसंरक्षक डॉ. सुजित नेवसे यांनी केले.

वन्यजीव सप्ताहानिमित्त पूर्व वनविभाग, नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव विभाग व वनबहुउद्देशीय संस्था (निफाड) यांच्या संयुक्त विद्यमाने बिबट्या प्रवणक्षेत्र गावांमध्ये जनजागृती करताना ते बोलत होते. यावेळी येवला वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय म्हेत्रे, नांदूरमध्यमेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर, वनपरिमंडळ अधिकारी प्रीतेश सरोदे, भगवान जाधव आदी उपस्थित होते. तत्पूर्वी बिबट्या-मानव सहजीवन केंद्र (निफाड) ते नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य अशी दुचाकी रॅली काढण्यात आली होती. दरम्यान, मानव – बिबट्या संघर्ष टाळण्यासाठी कसबे – सुकणे, चित्तेगाव, वर्‍हेदारणा, चांदोरी, सायखेडा, करंजगाव, चापडगाव आदींसाठी स्थानिक ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. शाळा – महाविद्यालयातील जनजागृती कार्यक्रमात वनविभागाच्या अधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. वाघ आणि बिबट्या यांची वेशभूषा केलेले वन्यजीवप्रेमी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते.

अशी घ्या काळजी…
अंगणात झोपू नये, विद्यार्थ्यांनी शाळेत गटा-गटाने ये-जा करावी, रात्रीच्या वेळी शेतातून जाताना घुंगराची काठी वापरावी अथवा मोबाइलवर मोठ्याने गाणी वाजवावी, बिबट्या विहिरीत पडला असेल अथवा दिसल्यावर त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा, शेतात घर असल्यास घराला 10 फूट जाळीचे बंदिस्त कुंपण करावे, बछडे आढळल्यास तत्काळ माहिती द्यावी, त्या बछड्यांजवळ जाऊ नये, तिथे पिलांची आई असू शकते, तिच्या हल्ल्याचा धोका नाकारता येत नाही, घर-परिसर स्वच्छ ठेवावा, घराजवळ मोठा लाइट लावून प्रकाश करावा.

हेही वाचा:

The post वन्यजीव सप्ताह : मानव-बिबट्या सहजीवन जागृतीची आवश्यकता appeared first on पुढारी.