वन्यप्राणी निघाल्यास त्या भागात राहणार संचारबंदी; खबरदारी म्हणून शहर-जिल्ह्यासाठी आदेश

नाशिक : बिबट्यासह वन्यप्राणी चुकून मानवी वस्तीत घुसल्यास त्याला पाहण्यासाठी, पकडण्यासाठी जी धावपळ उडते, ती नागरिकांप्रमाणेच संबंधित वन्यप्राण्याच्या जिवावर बेतते, यापूर्वी शहरात-जिल्ह्यात अशा प्रकारातून अनेक गंभीर घटना घडल्या आहेत.

पुण्यात दोन दिवसांपूर्वी रानगव्याचा मृत्यू अशाच कारणातून झाला. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्यात वन्यप्राणी निघेल, अशा भागात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यात हा आदेश लागू राहणार आहे. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

तर संबंधितावर फौजदारी कारवाई होणार

वन्यप्राणी निघालेल्या भागात सामान्य नागरिकांसह उत्साही युवकांना बाहेर पडून संबधित प्राणी पकडण्यासाठी उत्साह दाखविण्याची अजिबात गरज नाही. त्या भागात पोलिस, वन्य विभागासह आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कर्मचारी व पथकच कार्यरत असतील. कुणीही ओरडाओरडा करून संबंधित प्राण्याला घाबरवणार नाही आणि स्वतःसह नागरिकांचा आणि त्या प्राण्याचा जीव धोक्यात घालणार नाही, असा आदेश बजावला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे यापुढे चुकून मानवी वस्तीत वन्यजीव आल्यास त्या भागात सामान्य नागरिकांना प्रवेशबंदी असणार आहे. प्रवेश केल्यास तो गुन्हा ठरून संबंधितावर फौजदारी कारवाई होणार आहे. नागरिकांची गर्दी आणि अतिउत्साही मंडळींच्या गोंगाटामुळे वन्यप्राणी बिथरून आणखी उच्छाद मांडतात. त्यातून परिस्थिती आणखी बिकट होऊन लोकांच्या आणि प्राण्यांच्या जिवावर बेतते. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले. 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा