नाशिक : जिल्ह्यात नाशिक महापालिका हद्दीतील कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर परिस्थितीवर लक्ष ठेवताना नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती शहरातील विभागांचे नोडल ऑफिसर म्हणून केली आहे. विभागनिहाय परिस्थितीचा दैनंदिन आढावा घेताना आयुक्तालयात होणाऱ्या बैठकीत सविस्तर माहिती सादर करण्याच्या सूचना आयुक्त जाधव यांनी दिल्या आहेत.
आढाव्यानंतर रोज अहवाल सादर करण्याच्या आयुक्तांच्या सूचना
महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी यासंदर्भात आदेश पारीत केले आहेत. नोडल अधिकारी म्हणून काम करताना संबंधित अधिकाऱ्यांनी करावयाच्या कार्यवाहीचा सविस्तर तपशील आदेशात नमूद केला आहे. आदेशात म्हटले आहे, की महापालिका क्षेत्रात सर्वच विभागांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सर्व विभागांतर्गत सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या कामकाजासाठी समन्वय राखण्याच्या दृष्टीने नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करत असल्याचे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी नमूद केले आहे.
...अशा असतील जबाबदाऱ्या
नोडल अधिकाऱ्यांनी रोज सकाळी जबाबदारी दिलेल्या विभागाच्या कार्यालयात उपस्थित राहून संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आढावा घ्यायचा आहे. डेडिकेटेड कोविड १९ हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांबाबत दैनंदिन अद्ययावत करताना शासन निर्देशाप्रमाणे आवश्यक कार्यवाही करणे. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल रुग्णांबाबत दैनंदिन माहिती अद्ययावत करणे, कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल रुग्णांपैकी लक्षणे नसणाऱ्या व्यक्ती, लक्षणे नाहीशी झालेले रुग्ण, लक्षणे नसणारे परंतु गृहविलगीकरण नाकारलेले रुग्ण आदींची माहिती अद्ययावत करायची आहे. गृहविलगीकरणाकरिता परवानगी दिलेल्या व्यक्तींबाबतची माहिती, बेड व्यवस्थापनाबाबतची दैनंदिन माहिती, लसीकरणाबाबत, विभागातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची, ॲन्टिजेन व आरटीपीसीआर चाचण्यांची माहिती संकलित करायची आहे. ही माहिती आयुक्त कार्यालयात रोज दुपारी बाराला होणाऱ्या बैठकीत सादर करायची आहे.
विभागनिहाय नियुक्त नोडल ऑफिसर
नाशिक पश्चिम ः उपायुक्त (समाजकल्याण) अर्चना तांबे
नाशिक पूर्व ः उपायुक्त (कर) प्रदीप चौधरी
पंचवटी ः मुख्य वित्त व लेखा अधिकारी नरेंद्र महाजन
सातपूर ः उपायुक्त (अतिक्रमण) करुणा डहाळे
सिडको ः उपायुक्त (उद्यान) शिवाजी आमले
नाशिक रोड ः मुख्य लेखापरीक्षक बोधीकरण सोनकांबळे
----