वरिष्ठ पोलीस निरीक्षक उतरले रस्त्यावर; बारचालकाला दिला ५ हजारांचा दणका

म्हसरूळ (जि.नाशिक) : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, व्यावसायिक आणि नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मोठी मदत होईल. प्रत्येकाने शासकीय यंत्रणेला सहकार्य करणे अपेक्षित आहे. यासाठी आता स्वत: पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रस्त्यावर उतरले आहेत. पहिल्याच धडाक्यात त्यांनी बारचालकाला दणका दिला आहे.

पहिल्याच धडाक्यात बारचालकाला दणका

पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत स्वतः पथकासह रस्त्यावर उतरले असून, पहिल्याच धडाक्यात त्यांनी मास्क न वापरणाऱ्या व सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या पंचवटीतील एका रेस्टॉरंट व बारचालकावर दंडात्मक कारवाई केली. मालेगाव स्टॅन्ड येथील न्यू पंजाब रेस्टॉरंट ॲन्ड बारचालकाने मास्क न लावता सोशल डिस्टन्सही पाळले नाहीत, ही बाब वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत, निरीक्षक (गुन्हे) अशोक साखरे व त्यांच्या पथकाला पेट्रोलिंगदरम्यान लक्षात आली. पथकाने रविवारी (ता. १४) रात्री बारमालकावर दंडात्मक कारवाई करत नियम पाळण्याच्या सूचना केल्या. पोलिसांनी या व्यावसायिकाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे पंचवटीतील व्यावसायिक व दुकानदारांचे धाबे दणाणले आहे. कारवाईत नाईक रवी आढाव, शिपाई राजू राठोड, यतीन पवार, विजय जारवाल आदी कर्मचारी सहभागी झाले होते. 

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, व्यावसायिक आणि नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मोठी मदत होईल. प्रत्येकाने शासकीय यंत्रणेला सहकार्य करणे अपेक्षित आहे. मास्क, सोशल डिस्टन्स असे साधे नियम न पाळल्यास यापुढे कठोर कारवाई केली जाईल. 
-अशोक भगत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पंचवटी 

 हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर